लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. त्यामुळे शहर व जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर बंद होऊ लागली आहेत. सेंटर बंद होत असल्याने कंत्राटी कर्मचारी व परिचारिकांना कामावरून कमी करण्यात आले आहे. नागपूर शहरात ६२ कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. यात महापालिकेचे सहा, तर खासगी ५६ सेंटरचा समावेश आहे; परंतु संक्रमण कमी झाल्याने कोविड केअर सेंटरमधील रुग्णसंख्या कमी झाली आहे. काही सेंटरवर एकही रुग्ण उपचार घेत नसल्याने बहुसंख्य खासगी कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले आहे. यामुळे नोकरी गेल्याने ५०० ते ५५० कंत्राटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.
नागपूर शहरातील एकूण कोविड केअर सेंटर - ५६
सध्या सुरू असलेले सेंटर - ६
बंद झालेले सेंटर - ५६
नागपूर शहरातील एकूण रुग्ण - ३,३१,९६५
बरे झालेले रुग्ण - ३,२५,११०
कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले रुग्ण - २५०
५६ कोविड केअर सेंटर बंद
नागपूर जिल्ह्यातील कोविड रुग्णांची संख्या कमी झाली आहे. रुग्ण नसल्याने शहरातील जवळपास ५६ खासगी कोविड सेंटर बंद करण्याच्या मार्गावर वा बंद करण्यात आले आहेत. यामुळे येथील कंत्राटी कर्मचारी, परिचारिकांना कामावरून कमी करण्यात आले आहे.
वेळ पडली बोलावले, नंतर हाकलले!
कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोविड केअर सेंटरवर तीन महिने काम केले. त्यानंतर कामावरून कमी केले. दुसऱ्या लाटेत पुन्हा कामावर बोलावले. तीन महिने काम केले. आता रुग्ण नसल्याने सेंटर बंद करण्यात आल्याने आमची नोकरी गेली. वेळ पडली की, बोलावले, नंतर हाकलले, अशी आमची अवस्था असल्याची प्रतिक्रिया सेंटरवर काम करणारे मिलिंद सोनकुसरे यांनी दिली. एका खासगी कोविड केअर सेंटरवर काम करणारे सूर्यभान गजभिये यांनीही अशीच प्रतिक्रिया दिली. गरज पडली की बोलवायचे आणि गरज संपली की घरी जा, असे सांगितले जाते.
मनपाच्या सेंटरवरील रुग्ण कमी झाले
कोविड संक्रमण अधिक असताना रुग्णांची संख्या वाढल्याने महापालिकेने सहा कोविड केअर सेंटर सुरू केले; परंतु गेल्या दीड महिन्यात रुग्णांची संख्या कमी झाल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.