लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका निवडणुकीचे पडघम वाजायला लागताच सर्वपक्षीय नगरसेवकांना समस्यांची आठवण झाली आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्डे, जागोजागी पडून असलेला कचरा, अपुरा पाणीपुरवठा अशा मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा साक्षात्कार झाला. बुधवारी सभागृहात प्रशासनावर हल्लाबोल करीत आम्हीच जनतेचे कैवारी असल्याचा आभास निर्माण केला.
खड्ड्यांमुळे शहरातील नागरिक त्रस्त आहेत. तक्रारी करूनही दुरुस्ती होत नसल्याने नगरसेवक व पदाधिकाऱ्यांवर प्रचंड रोष आहे. प्रभागात फिरणे अवघड झाले आहे. अशीच परिस्थिती कचऱ्याची आहे. दररोज कचरा उचलला जात नाही. २४ बाय ७ योजनेची सत्ताधाऱ्यांनी घोषणा केली होती. मात्र अजूनही अनेक वस्त्यांना पाणीपुरवठा होत नाही. त्यात दोन वर्षांपासून शहरातील विकासकामे ठप्प आहेत. याचे पडसाद बुधवारी सभागृहात उमटले.
प्रश्नोत्तराच्या तासात वैशाली नारनवरे यांनी खड्ड्यांचा प्रश्न उपस्थित केला. काँग्रेसचे हरीश ग्वालबंशी म्हणाले, शहरातील युवक रस्त्यावरील खड्ड्यांना महापौर, आयुक्त व पदाधिकाऱ्यांची नावे देत आहेत. विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी खड्ड्यांचा प्रश्न एका प्रभागापुरता मर्यादित नसून संपूर्ण शहरात ही समस्या असल्याचे निदर्शनास आणले. स्थायी समितीचे अध्यक्ष प्रकाश भोयर यांनी शहरातील रस्ता कुणाचा याचा फलक लावला जावा, यामुळे मनपाची बदनामी होणार नाही, असे सुचविले. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विजय झलके यांनीही रस्ते दुरुस्तीची मागणी केली.
बांधकाम विभागाचे प्रमुख अजय पोहेकर यांनी शहरात मनपाचे १४९१ किमी लांबीचे रस्ते असल्याची माहिती दिली. मनपाचा हॉटमिक्स प्लांट जुना झाला आहे. इन्स्टा पॅचरच्या साहाय्याने खड्डे बुजविले जात असल्याची माहिती दिली. सत्ता पक्षनेते अविनाश ठाकरे यांनी मागील तीन वर्षांत प्रशासनाने किती खड्डे बुजवले, डांबरीकरण किती झाले, याची माहिती मागितली; परंतु प्रशासनाने ती दिली नाही.
...जोड आहे...