निशांत वानखेडे
नागपूर : गडर तुंबलय; कर मनपाला कॉल..., गाळ साचलाय; कर मनपाला कॉल..., बोलवा ऐवजदाराला.., लवकर का येत नाही म्हणून हासडा चार शिव्या..., तो काम करीत असताना नाकावर रुमाल मात्र धरा, काम झाल्यावर साधे पाणीही विचारू नका, कधी साधी तब्येतीची चौकशीही करू नका ! मनपातील ऐवजदारांच्या दैनंदिन आयुष्यात असा अनुभव नवा नाही. वितभर पोटासाठी आणि कुटुंबाच्या पोषणासाठी हा पेशा पत्करलेल्या सफाई कर्मचारी आणि ऐवजदारांच्या बकाल आयुष्याचा कुणी विचारही करीत नाही, तरीही त्यांची सेवा मात्र विनातक्रार !
२०१३ पासून डाेक्यावर मैला वाहून नेण्याच्या कामावर (मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग) प्रतिबंध घालण्यात आला आहे. मात्र, त्यानंतरही गडर उपसण्यासारखे काम सुरूच आहे. यात बहुतेक राेजंदारी व कंत्राटदारांकडे काम करणाऱ्यांचा समावेश आहे. काही स्थायी झालेल्या कर्मचाऱ्यांनाही अनुभवामुळे हे काम करावेच लागते. अद्यापही कामाच्या पद्धतीत फारसा बदल झालेला नाही. नागपूर शहरात आता सेप्टीक टॅंक राहिले नाही. बहुतेक वस्त्या गडरलाईनने जाेडल्या आहेत. मात्र, आजही त्यात उतरावेच लागते. मनपामध्ये अशा कर्मचाऱ्यांना ‘चाेकेज गॅंग’ म्हणून ओळखले जाते. यातील बहुतेक कर्मचाऱ्यांच्या व्यथा सारख्याच आहेत.
महानगर आपल्या व्यस्ततेत गुंतले असताना गडरचे झाकण उघडून त्यातून मळ आणि गाळ उपसणारे ऐवजदारही राबत असतात. मात्र त्यांच्या कामाची साधी दखलही कुणाला नसते. पद वजनदार असले तरी परिश्रमाचे मोल मात्र हलके असणाऱ्या या ऐवजदारांच्या आयुष्यात डोकावून पाहण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला.
आपले नाव उघड न करण्याच्या अटीवर एक वयस्क ऐवजदार म्हणाला, महापालिकेत या पदावर लागलाे तेव्हा सुरुवातीचे दिवस अतिशय वाईट हाेते. पहिल्यांदा गडरच्या चेंबरमध्ये उतरलो तो दिवस आयुष्यात विसरू शकत नाही. उतरताच दुर्गंधी व दृश्य पाहूनच उलटी झाली. पुढे अनेक दिवस जेवणाकडे लक्षच लागत नव्हते. वाटलं नकाे हे काम, पण शिक्षण कमी असल्याने दुसरे काय करणार ? पुढे स्थायी नाेकरी मिळेल, या आशेवर मन पक्के करून पुन्हा त्याच कामाकडे वळलाे. आता २०-२२ वर्षात हे सारे सरावाचे झालेय.
अत्यल्प राेजी व सुरक्षा साधनांचा अभाव
मनपाच्या आसीनगर झाेनच्या परिसरात काम करणारे सुरेश व सचिन (नाव बदललेले) अनेक वर्षांपासून ऐवजदार म्हणूनच काम करत आहेत. १९९९ साली बाहेरगावाहून नागपूरला आलेले सुरेश यांनी शहरात जगण्यासाठी हे काम पत्करले. जेमतेम ७० रुपये मिळायचे. आता बऱ्यापैकी पगार मिळताे. मात्र, सुरक्षेच्या साधनांचा अभाव आहे. शुज, हॅण्डग्लाेव्हज् व मास्क मिळताे. चेहऱ्यापासून शरीर झाकणाऱ्या फूल बाॅडी जॅकेटबद्दल तर त्यांना काही माहिती नाही. अनेकदा काम करताना माेजे फाटतात किंवा निसटून जातात, पुन्हा तेच वापरावे लागतात.
म्हणून दारू पिऊनच काम !
रमेश व नितीन म्हणाले, आम्ही कामावर कधीच दारू घेतली नाही. मात्र, बहुतेकांना दारू पिल्याशिवाय पर्याय नसतो. रामदासपेठेत काम करत असलेली काही माणसे भेटली. गडरमध्ये उतरल्यानंतर ती भयावहता पाहून किळसवाणे हाेते, मन अस्वस्थ हाेते. त्यामुळे दारूचा ग्लास हाती घेतल्याशिवाय काम करण्याची हिंमतच होत नाही.
भविष्याची सुरक्षा काय?
या सर्वांनाच भविष्याची चिंता आहे. एका कंत्राटदार कंपनीमध्ये राजन व श्याम कामाला आहेत. मात्र त्यांना भविष्य निर्वाह निधी किंवा सुविधा लागू नाहीत. धोका असला तरी तो पत्करूनच काम करावे लागते. अपघात झाला तर कंत्राटदार हात वर करतो. गडर चाेकेजचे काम करायला गेल्यानंतर सन्मान दूरच, बहुतेक वेळा पिण्यास पाणीही मिळत नाही.
काडी पेटवूनच गॅसचा धाेका तपासतो
अनेक दिवस बंद असलेल्या गडर चेंबरमध्ये विषारी वायू तयार हाेण्याचा धाेका असताे. तो तपासण्यासाठी आधुनिक साधने कुणालाच मिळाली नाहीत. त्यामुळे गडरमध्ये उतरण्यापूर्वी माचिसची काडी किंवा कागद जाळूनच वायूचा धाेका तपासाला जातो.