नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होताच जून महिन्यापासून निर्बंध शिथिल करण्यात आले. परिणामी वाहतुकीचे प्रमाण वाढून अपघातातही वाढ झाली. निर्बंध असताना मेडिकलमध्ये दिवसाकाठी रस्ता अपघातातील एक किंवा दोन जखमी यायचे. आता किरकोळसह गंभीर जखमींची संख्या १०च्या घरात गेली आहे.
कोरोनाची दुसरी लाट फेब्रुवारीपासून तीव्र होऊ लागताच शासनाने कठोर निर्बंध लावले. एप्रिल महिन्यात या लाटेतील सर्वाधिक रुग्ण व मृत्यूची नोंद झाली. परंतु मे महिन्यापासून लाट ओसरू लागताच जून महिन्यात काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले. जुलै महिन्यात यात आणखी शिथिलता आणून ऑगस्ट महिन्यात रात्री १० वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याला परवानगी देण्यात आली. परिणामी, जून महिन्यात ७४ तर जुलै महिन्यात ९३ अपघात झाले. ऑगस्ट महिन्यात याच्या दुप्पट अपघाताची नोंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-मागील दोन महिन्यात अपघातामुळे ५१ मृत्यू
जानेवारी महिन्यात ७९ अपघातात २३ जणांचा बळी गेला. फेब्रुवारी महिन्यात अपघातांची संख्या वाढून ९६ झाली. यात २३ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मार्च महिन्यात कठोर निर्बंध लावण्यात आले. यामुळे अपघाताची संख्या आणखी कमी होऊन ६९ झाली, १९ मृत्यूची नोंद झाली. एप्रिल महिन्यात कोरोनाची लाट तीव्र होती. त्यानंतरही ५५ अपघात झाले व १७ मृत्यूची भर पडली. मे महिन्यात ५१ अपघातात २० मृत्यू तर जून महिन्यात निर्बंध शिथिल होताच अपघाताची संख्या वाढून ७४ झाली. यात २५ जणांना आपल्या जीवाला मुकावे लागले तर जुलै महिन्यात ९३ अपघात व २६ मृत्यूची नोंद झाली.
-मेडिकलमध्ये वाढली अपघातातील जखमींची संख्या
अपघातातील जखमींना ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार देऊन जीव वाचविण्यासाठी ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात आले. परंतु कोरोनामुळे या सेंटरला कोविड केअर सेंटरमध्ये रूपांतरित केले. या दरम्यान अपघातांची संख्याही कमी होती. परंतु आता रस्ता अपघातातील जखमींची संख्या वाढल्याने ‘ट्रॉमा’ सुरू करण्याची मागणी होऊ लागली आहे. सध्या मेडिकलमध्ये रोज जवळपास १०च्यावर अपघातातील जखमी येत असल्याचे येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे.
-८० टक्के अपघात मानवी चुकांमुळे
निर्बंध असतानाही अपघात व मृत्यूसत्र सुरूच होते. जानेवारी ते जुलै या दरम्यान ५१७ अपघात व १५३ जणांचे बळी गेले. ५२७ जण जखमी झाले. ही संख्या कोणत्याही प्रकाराच्या आजाराने किंवा नैसर्गिक आपत्तीने होणाऱ्या जीवहानीपेक्षाही मोठी आहे. यातील ८० टक्के अपघात मानवी चुकांमुळे झाले आहेत. हे निश्चितच टाळता येण्यासारखे आहे. यामुळे वाहतुक नियमांना घेऊन व्यापक जनजागृतीची गरज निर्माण झाली आहे.
-राजू वाघ, सदस्य, राष्ट्रीय रस्ता सुरक्षा परिषद
-अपघाताची आकडेवारी
महिना : अपघातांची संख्या : मृत्यू
जानेवारी : ७९ : २३
फेब्रुवारी : ९६ : २३
मार्च : ६९ : १९
एप्रिल : ५५ : १७
मे : ५१ : २०
जून : ७४:२५
जुलै : ९३ : २६