नागपूर : महाविद्यालये ही शिक्षणाची मंदिरे असतात असे वर्णन केले जाते. मात्र अनेक ठिकाणी शिक्षणासोबतच राजकारणावर जास्त भर दिला जातो. यातूनच काहीजण नैराश्यात जातात. अशाच नैराश्यातून शहरातील नामांकित जीएस महाविद्यालयातील प्राध्यापक गजानन कराळे (४१) यांनी आत्महत्या केली. आत्महत्येअगोदर त्यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये त्यांनी पत्नी व मुलाची माफी मागितली व तणावाचे कारण स्पष्ट केले. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली असून, महाविद्यालय प्रशासनाबाबत विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.
गजानन कराळे हे जीएस महाविद्यालयात शिकवायचे. ते मूळचे अमरावतीचे असले तरी मागील काही वर्षांपासून नागपुरातच स्थायिक झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महाविद्यालयातील अंतर्गत राजकारणामुळे ते त्रस्त होते. काही प्राध्यापक त्यांना त्रास देत होते. सुटी घेण्यासदेखील त्यांना अडचणी येत होत्या. यामुळे ते मानसिक तणावात होते व अक्षरशः नैराश्यात गेले होते. त्यांनी आपल्या मनातील सल पत्नी व नातेवाइकांनादेखील बोलून दाखविली होती.
शनिवारी त्यांनी नातेवाइकांकडे लग्न असल्यामुळे पत्नी व मुलाला अमरावतीला पाठवले होते. त्यानंतर त्यांनी नरेंद्रनगर येथील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच बेलतरोडी पोलिस ठाण्याचे पथक त्यांच्या घरी पोहोचले. पोलिसांनी त्यांच्या घरून सहा पानांची सुसाइड नोट जप्त केली आहे. अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
मी कुणाचेच वाईट केलेले नाही
आपल्या मनातील तणाव ते नातेवाइकांजवळ बोलून दाखवायचे. आत्महत्या करण्याअगोदर त्यांनी त्यांच्या जावयाला फोन केला होता. काही दिवसांपासून तणावात असल्याचे त्यांनी सांगितले होते. मी कधीही कुणाचे वाईट केले नाही, तरीपण मला लोक त्रास का देतात, असा सवाल त्यांच्या मनात होता.
पत्नीने काढली होती समजूत
गजानन कराळे हे मूळचे अमरावतीचे होते. महाविद्यालयातील तणावाबाबत त्यांनी पत्नीला सांगितले होते. काहीजण मला खोट्या चौकशीत फसवून नोकरी घेण्याचा प्रयत्न करत असून, यामुळे तणावात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती. त्यांची पत्नी नेहमी त्यांची समजूत काढायची. आत्महत्येअगोदर त्यांनी सुसाइड नोट लिहिली व त्यात ‘सॉरी ...मी तुझ्या इच्छा पूर्ण करू शकलो नाही. सॉरी बाळा, मी तुझ्या भविष्यासाठी काहीही करू शकलो नाही’, असे नमूद केले.
कुणावर कारवाई होणार?
नागपुरातील अनेक महाविद्यालयांत राजकारण आणि त्यातून निर्माण होणारे तणाव ही चिंतेची बाब झाली आहे. या प्रकरणात आता पोलिस नेमके कुणावर कारवाई करतात याकडे नातेवाइकांचे लक्ष लागले आहे. महाविद्यालयातील माजी प्राचार्य, उपप्राचार्य, त्रास देणारे प्राध्यापक यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी नातेवाइकांनी केली आहे.