लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात वाफेचे ब्रिटिशकालीन बुलंद इंजिन ठेवण्यात आले आहे. प्रवाशांच्या दृष्टीने आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या या इंजिनमधून सध्या इंजिनचा आणि शिटीचा आवाज येत असल्यामुळे हे इंजिन आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. याशिवाय बुलंद इंजिनच्या सभोवताल आकर्षक रोषणाई करण्यात आल्यामुळे या इंजिन आणि रेल्वेस्थानकाच्या सौंदर्यात भर पडली आहे.पुरातन काळात वाफेच्या शक्तीवर धावणारे हे इंजिन अजनी परिसरात होते. ब्रिटिशांच्या काळात कार्यरत हे इंजिन ऐतिहासिक वारसा म्हणून जतन करण्यासाठी तत्कालीन ‘डीआरएम’ बृजेश कुमार दीक्षित यांनी नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर चबुतरा तयार करून त्यावर ठेवले होते. मागील पाच वर्षांपासून हे इंजिन प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहे. अनेक प्रवासी वाफेच्या शक्तीवर धावणाऱ्या या इंजिनसह सेल्फी काढतात. आता मध्य रेल्वेच्या इलेक्ट्रिक विभागाने या इंजिनकडे आणखी प्रवासी आकर्षित व्हावे यासाठी इंजिनमध्ये स्पीकर लावून त्यातून इंजिन सुरू झाल्याचा आवाज रेकॉर्डिंग करून टाकला आहे. ठराविक कालावधीनंतर हे इंजिन सुरू झाल्याचा आवाज येतो. शनिवारी अचानक रेल्वेस्थानकावरील वाफेचे इंजिन सुरू झाल्याची बातमी रेल्वेस्थानक परिसरात पसरली आणि या इंजिनला पाहण्यासाठी प्रवाशांनी एकच गर्दी केली. यासोबतच बुलंद इंजिनच्या सभोवताल आकर्षक रोषणाई केल्यामुळे रात्रीच्या वेळी रेल्वेस्थानकाच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.