लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरचे दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नृत्य, कला, साहित्य, संगीत या विविध कला व कलावंतांसाठी मध्य भारतातील हक्काचे व्यासपीठ राहिले आहे. केंद्राने विविध उपक्रमाद्वारे रसिकांसाठी कलेचे दालन समृद्ध केले आहे. मात्र प्रस्थापित कलावंतासोबतच नवोदितांच्या प्रतिभेलाही जोपासण्याचे काम दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राने करावे, अशी अपेक्षा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे व्यक्त केली.
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या संचालक मंडळाची बैठक शनिवारी सकाळी राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी केंद्र संचालक डॉ. दीपक खिरवडकर, आस्थापना अधिकारी श्रीकांत देसाई उपस्थित होते. राज्यपालांनी या केंद्राच्या परिसराची पाहणी केली. यावेळी केंद्राचे कार्यक्रम अधिकारी दीपक कुलकर्णी, प्रेमस्वरुप तिवारी, गोपाल बेतावार, दीपक पाटील, गणेश थोरात, शशांक दंदे उपस्थित होते.
------------------
राजभवन येथे सक्षमचे डिजिटल उद्घाटन
भारत पेट्रोलियम, गॅस ॲथॉरिटी ऑफ इंडिया, (गेल), इंडियन ऑईल कॉपोरेशन, यांचे संयुक्त उपक्रम असलेल्या संरक्षण क्षमता महोत्सव (सक्षम)चे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते शनिवारी सकाळी राजभवन येथे डिजिटल उद्घाटन करण्यात आले.
हरित व स्वच्छ उर्जा या संकेल्पनेवर आधारित ‘सक्षम’ अभियानात १५ फेब्रुवारीपर्यत इंधन बचतीवर व स्वच्छ पर्यावरणासाठी जनजागृती होणार आहे. यावेळी भारत पेट्रोलियमचे कार्यकारी संचालक रवि, गॅस ॲथॉरिटी ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक गौतम प्रसाद, इंडियन ऑईल कॉपोरेशनचे कार्यकारी संचालक अमिताभ अखौरी, यांनी यावेळी विचार व्यक्त केले. तेल उद्योग महाराष्ट्राचे राज्य समन्वयक संतोष निवेंडकर यांनी राज्यपालांचे स्वागत केले.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भेट राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दीक्षाभूमीजवळील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला शनिवारी भेट दिली. या भेटीत त्यांनी संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांची माहिती घेतली. दसाल्ट एव्हिएशन (फ्रान्स) व कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या एरोनॉटिकल स्ट्रक्चर व इक्युपमेंट फिटर या अभ्यासक्रमाच्या कार्यशाळेला देखील भेट दिली. कार्यशाळेतील विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. तत्पूर्वी संस्थेचे प्राचार्य हेमंत आवारे यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे संस्थेच्या विस्तृत कार्याची माहिती दिली. कौशल्य विकास विभागाचे आयुक्त दीपेन्द्रसिंह कुशवाहा यावेळी उपस्थित होते.