"२०२४ मध्ये दक्षिण-पश्चिम नागपूरचा कसबा होईल"; आशिष देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा
By कमलेश वानखेडे | Published: March 2, 2023 03:39 PM2023-03-02T15:39:13+5:302023-03-02T15:50:36+5:30
दक्षिण-पश्चिम नागपूर हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ आहे.
नागपूर : कसबा आणि नागपूर दक्षिण-पश्चिम या दोन्ही मतदारसंघांमध्ये साम्य आहे. येथील भौगोलिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती जवळपास सारखीच आहे. कसब्याच्या पोटनिवडणुकीत पंरंपरागत मतदारांनीही भाजपला धडा शिकवत काँग्रेसला विजयी केले. आता २०२४ मध्ये दक्षिण-पश्चिम नागपुरातही जनता भाजपला नाकारेल, असा दावा करीत काँग्रेसचे माजी आ. आशिष देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नेम साधला आहे.
दक्षिण-पश्चिम नागपूर हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ आहे. २०१९ मध्ये आशिष देशमुख यांनी काँग्रेसचे उमेदवार म्हणून याच मतदारसंघात फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. त्यावेळी देशमुख यांना पराभवाला सामोरा जावे लागले होते. आता कसबा निकालाचा आधार घेत देशमुख यांनी त्याच मतदारसंघावरून फडणवीस यांना लक्ष केल्याने राजकीय वतुर्ळाच्या भुवया उंचावल्या आहेत. देशमुख म्हणाले, २००९ व २०१४ ची निवडणूक फडणवीस हे आमदार म्हणून लढले. त्यावेळी त्यांना चांगले मताधिक्य मिळाले. मात्र, २०१९ मध्ये ते मुख्यमंत्री असताना आपण त्यांच्या विरोधात लढलो.
मला प्रचारासाठी फक्त ११ दिवस मिळाले. त्यावेळी फडणवीस हे एक लाखावर मतांनी निवडून येतील, असे दावे केले जात होते. पण ते ३५ हजारांनीच निवडून आले. त्यांचे मताधिक्य कमी करण्यात काँग्रेसला यश आले. दक्षिण-पश्चिम नागपूर हा भाजपचा गढ मानला जातो. कसबाही तसाच होता. या दोन्ही मतदारसंघात ब्राम्हण समाजाची सुमारे ३० ते ३५ टक्के मतदार आहेत. ते देखील भाजरपवर नाराज आहेत. आता कसब्याचा निकाल लागला. २०२४ मध्ये दक्षिण-पश्चिममध्येही काँग्रेस विजयी झालेली दिसेल, असा दावा देशमुख यांनी केला.
फडणवीसांविरोधात लढण्याची तयारी
२०१९ मधील पराभवानंतर आता २०२४ मध्ये पुन्हा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याविरोधात लढणार का, या प्रश्नावर देशमुख यांनी पक्षाने संधी दिली तर नक्कीच विचार करू, असे स्पष्ट केले. दक्षिण- पश्चिम नागपूरमध्ये आतुन खूप खदखद आहे. सामाजिक समीकरणे काँग्रेस सोबत आहेत. पक्षाने वेळीच सिग्लन दिला तर कामाला लागून चित्र पालटून दाखवू, असा दावाही देशमुख यांनी केला.