लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : हवामान खात्याने सतत काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर अनेकांच्या मनात धडकी भरली होती. अशातच १३ ते १६ जूनपर्यंत सतत चार दिवस दिवसभर उघडीप मिळाल्याने असंख्य शेतकऱ्यांनी या वातावरणाचा लाभ पदरात पाडून घेत पेरते झाले. तालुक्यात पेरणीला चांगलाच वेग आल्याचे चित्र दिसून येत आहे.
उमरेड तालुक्यात सोयाबीनचे एकूण क्षेत्र १६ हजार हेक्टरच्या आसपास आहे. यापैकी ३० ते ४० टक्के पेरणी आटोपली. कपाशीची लागवड २२,५०० हेक्टर क्षेत्रात आहे. यापैकी ४० ते ५० टक्के लागवड आटोपल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी दिली. तुरीचे क्षेत्र तालुक्यात तीन हजार हेक्टरच्या आसपास असून, आजपर्यंत ३० ते ४० टक्के शेतकऱ्यांनी तुरीची पेरणी आटोपली. तालुक्यात एकूण ४५ हजार हेक्टर क्षेत्रात खरीपाचे नियोजन आहे. येत्या दोन-चार दिवसात उर्वरित पेरण्या आणि लागवड पूर्ण होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. उमरेड तालुक्यात बुधवारपर्यंत (दि.१६) १२९.९६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. शिवाय उमरेड, बेला, सिर्सी, पाचगाव, मकरधोकडा आणि हेवती या सहा मंडळात सर्वत्र पेरणीयोग्य पाऊस झाला आहे.