लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : तालुक्यातील बेला, सिर्सी आणि मकरधोकडा परिसरात गुरुवारी (दि. १७) सायंकाळी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस बरसला. या पावसामुळे या भागातील नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले. पात्रातील पाणी लगतच्या शेतात शिरल्याने त्या किमान १५० हेक्टर शेतातील साेयाबीन व कपाशीचे पीक खरडून गेले आहे. याच शेतात पाणी साचून राहिल्याने उर्वरित पिके सडण्याची व त्या २५० शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ ओढवण्याची शक्यता बळावली आहे.
याच काळात काेसळलेल्या मुसळधार पावसामुळे उमरेड तालुक्यातील मसाळा, गोधनी, मेटमांगरूळ, तेलकवडसी, सुकळी, जुनोनी, दिघोरी आदी शिवारातील पिके उद्ध्वस्त झाल्याचे त्या गावांमधील अनेक शेतकऱ्यांनी सांगितले. यासंदर्भात आपण तहसीलदार प्रमोद कदम यांना निवेदन दिले असून, या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करून याेग्य नुकसान भरपाई देण्याची मागणी केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
या नुकसानग्रस्त पिकांपैकी काही भागाचे काही प्रमाणात सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती तलाठी रोशन बारमासे यांनी दिली. कृषी विभागातील कर्मचाऱ्यांसाेबत आणखी सर्वेक्षण करावे लागणार असल्याचेही राेशन बारमासे यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, शासन व प्रशासनाने या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी जयदेव आंबुलकर, प्रकाश राठोड, नामदेव कंगाले, प्रणित जाधव, हरिभाऊ उरकुडे, अनिल माटे, इंदिरा नागदेवते, विलास उरकुडे, अरुण देवगडे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी केली आहे.
...
११० मिमी पावसाची नाेंद
गुरुवारी (दि. १७) सिर्सी (ता. उमरेड) मंडळात (महसूल) तब्बल ११० मिमी पाऊस काेसळल्याची नोंद करण्यात आली. या मुसळधार पावसाने बेला शिवारालाही झोडपले. या परिसरात ३३.२ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. या पावसाचा परिसरातील सावंगी, चनोडा, हिवरा, बेला-सिर्सी व लगतच्या शिवारातील पिकांनाही फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवल्याची प्रतिक्रिया या भागातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
...
आधीच बियाण्याचा तुटवडा...
मागील खरीप हंगामात सोयाबीन पिकावर झालेला किडी व येल्लो मोझॅकचा प्रादुर्भाव यामुळे साेयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट झाली. त्यातच कापणीच्यावेळी आलेल्या परतीचा पावसामुळे साेयाबीनची प्रत आधीच खालावली हाेती. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात साेयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाल्याने दरही प्रचंड वाढले आहे. त्याच दुबार पेरणीचे संकट ओढवल्याने आता पेरणीसाठी साेयाबीन बियाणे आणायचे कुठून असा प्रश्नही शेतकऱ्यांसमाेर निर्माण झाला आहे.
....
आधीच आर्थिक संकटं पाचवीला पुजली आहेत. मुसळधार पावसाने सर्व मेहनत व पेरणीसाठी केलेल्या खर्चावर पाणी फेरले. आमच्या भागातील शेतकरी आता हताश झाले आहेत. दुबार पेरणीसाठी शासनाने तातडीने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यायला हवी.
- जयदेव आंबुलकर, नुकसानग्रस्त शेतकरी,
गोधनी, ता. उमरेड.