नागपूर : पूर्वी मुहूर्तावर सोयाबीनला ४ हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला होता. पण आता शेतकऱ्यांकडे सोयाबीन फार कमी असल्याने कळमना बाजारात विक्रीसाठी आणणाऱ्या सोयाबीनला दर्जानुसार ६५०० ते ७ हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होत आहे. पण शेतकऱ्यांकडे आता फार कमी सोयाबीन शिल्लक आहे.
गेल्या हंगामात विदर्भात सोयाबीनचे पीक ३० टक्केच आल्याने कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य बाजारात प्रारंभी सोयाबीनची आवक कमी होती. मुहूर्तानंतर आठ दिवसातच दर्जानुसार ३२०० ते ३७५० रुपये भाव मिळाला. तो आधारभूत किंमत ३८८० रुपयांपेक्षा कमी होता. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले होते.
धान्य बाजाराचे अडतिया कमलाकर घाटोळे म्हणाले, गेल्यावर्षी उद्दिष्टापेक्षा ७० टक्के पीक आले होते. याशिवाय मुहूर्तानंतर कळमन्यात दररोज ८ ते १० हजार पोत्यांची आवक होती. त्या तुलनेत जवळपास तीन हजार पोत्यांची आवक होती. मुसळधार पाऊस आणि रोगाच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन खराब झाले होते. अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन शेतातच खराब झाले होते. पण आता साठवून ठेवलेले सोयाबीन शेतकरी बाजारात आणत आहेत. जास्त दरात विक्री होत असल्याने त्यांना आर्थिक फायदा होत आहे. सोयाबीनचे दर वाढल्याने तेलाचे दर १५० रुपये किलोवर गेले आहेत. त्याचा गरीब आणि सामान्यांना फटका बसत आहे.