काेंढाळी : शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घरच्याच साेयाबीनचा वापर करावा. त्यासाठी पेरणीपूर्वी साेयाबीनच्या बियाण्यांची उगवणशक्ती तपासून बघावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. त्यासाठी या विभागातील कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना बियाण्यांची उगवणशक्ती कशी तपासावी, याची प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली.
सध्या कृषी विभागाच्या वतीने काटाेल तालुक्यात बियाणे उगवणशक्ती तपासणी माेहीम राबविली जात असून, कृषी विभागाचे कर्मचारी शेतकऱ्यांच्या शेतात अथवा घरी जाऊन शेतकऱ्यांना याबाबत प्रत्यक्षिकांद्वारे माहिती देत आहेत. काेराेना संक्रमण लक्षात घेता, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या दृष्टीने शेतात कार्यक्रम आयाेजित करण्यावर विशेष भर दिला जात आहे. शिवाय, याची शेतकऱ्यांना माहिती व्हावी म्हणून साेशल मीडियाचाही वापर केला जात आहे. कृषी सहायक जगन्नाथ जायेभाये यांनी नुकतीच काेंढाळी (ता. काटाेल) येथील शेतकऱ्यांच्या भेटी घेत त्यांना साेयाबीन बियाणाची उगवणशक्ती कशी तपासावी, याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली. बियाणे पेरण्यापूर्वी त्याची बीजप्रक्रिया करण्याचे आवाहनही कृषी सहायक जगन्नाथ जायेभाये यांनी केले.