नागपूर : सिंगापूर येथून २१० मेट्रिक टन सोयाबीन बोलावून ते १ कोटी ५६ लाख ८२ हजार ८८५ रुपयांना विकून परस्पर रक्कम हडपून सिंगापूरच्या व्यक्तीची फसवणूक करणाऱ्या आरोपींविरुद्ध गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सुजाता मालेवार (वय ३८) आणि साईकुमार जयकांत जयस्वाल (दोघे रा. सुभाषरोड, कॉटन मार्केट) अशी आरोपींची नावे आहेत. ते सुभाषरोड कॉटन मार्केट येथील सॅगरीस इम्पॅक्स कंपनीत काम करतात. आरोपींनी दि. ४ सप्टेंबर २०२१ ते १६ जून २०२३ दरम्यान फिर्यादी दुर्गेशकुमार श्रीगोपाल नागोरी (वय ५३, रा. २२, क्यून्स क्लोज युनिट १२/१५७ सिंगापूर) यांच्यासोबत कार्यालयातून सोयाबीन व्यापाराबाबत २१० टन मेट्रिक टन सोयाबीनचा करार केला. भारतीय चलनानुसार हे सोयाबीन १ कोटी ५६ लाख ८२ हजार ८८५ रुपयांचे होते. नागोरी यांनी कार्गोने मुंबईला माल पाठविला. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आरोपींनी फेब्रुवारी २०२२ मध्ये संपूर्ण सोयाबीन आपल्या ताब्यात घेऊन ते सांगली कुपवाडा, सांगली एमआयडीसी येथील राधेकृष्ण एक्स्ट्रॅक्सन प्रा. लिमिटेडला विकले. सोयाबीन विकल्यानंतर नागोरी यांना सोयाबीनची रक्कम देणे अपेक्षित होते. परंतु आरोपींनी सोयाबीन विकून मिळालेली रक्कम न देता नागोरी यांची फसवणूक केली. याप्रकरणी नागोरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ४२०, ३४ नुसार गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
................