लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाच्या सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशमधून जातो व तेथील राजकीय समीकरणांमुळे देशाच्या राजकारणाची दिशा ठरते. समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षासोबत जर काँग्रेसनेदेखील हातमिळवणी केली असती तर भाजपासमोरील आव्हान वाढले असते. मात्र केवळ सपा-बसपा आघाडीमुळे भाजपाला उत्तर प्रदेशात फारसे नुकसान होणार नाही, असा विश्वास मछलीशहरचे भाजप खासदार राम चरित्र निषाद यांनी व्यक्त केला. भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी नागपुरात आले असता त्यांनी ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांची त्यांच्या ‘यवतमाळ हाऊस’ या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.उत्तर प्रदेश व बिहार या राज्यांमध्ये जातीय समीकरण फार महत्त्वाचे ठरते. सपा, बसपा, काँग्रेस, भाजपा यांची स्वतंत्र ‘व्होट बँक’देखील आहे. मात्र निवडणुकात मतांचे ध्रुवीकरण होईल. त्यामुळे भाजपाला फारसे नुकसान होणार नाही. उत्तर प्रदेशमध्ये ७५ हून अधिक जागांचे उद्दिष्ट भाजपाने ठेवले आहे व त्यात यश मिळेल, असे प्रतिपादन निषाद यांनी केले. विविध राज्यांमध्ये सवर्णांच्या नाराजीमुळे ‘नोटा’चे प्रमाण वाढले होते. मात्र इतर मागासवर्गीय जातीमधून आलेल्या एका पंतप्रधानाने सवर्णांना आर्थिक आधारावर आरक्षण दिले. त्यामुळे सवर्ण निश्चित निवडणुकात भाजपासोबत येतील, असा अंदाजदेखील त्यांनी व्यक्त केला.राममंदिराबाबत जनतेसोबतच संघाकडून अध्यादेश आणण्याची मागणी होत आहे. मात्र न्यायालयात प्रकरण आहे. संघ स्वयंसेवकात काही प्रमाणात नाराजी नक्कीच आहे. मात्र संघ भाजपाचा कणा आहे व ही नाराजी लवकरच दूर होईल, असे निषाद म्हणाले. तत्पूर्वी विजय दर्डा यांनी निषाद यांचे स्वागत केले.गडकरींच्या नेतृत्वात गंगेचे स्वरूप पालटतेयराम चरित्र निषाद यांच्या मतदारसंघात वाराणसीचादेखील भाग येतो. देशाचे वाराणसी व गंगा नदी शुद्धीकरणाकडे लक्ष लागले आहे. याबाबत विचारणा केली असता नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात गंगा नदी बऱ्यापैकी स्वच्छ झाली आहे. पुढील पाच वर्षांत १०० टक्के गंगा स्वच्छ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वाराणसीचेदेखील चित्र बदलत असून, शहराचा विकास होत असल्याचे त्यांनी सांगितले. नरेंद्र मोदी व नितीन गडकरी हे दोघेही आपापल्या ठिकाणी उत्तम काम करीत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.योगी मेहनती, मात्र अनुभवाची थोडी कमीयोगी आदित्यनाथ यांच्यावर होत असलेल्या टीकेबाबत त्यांना विचारणा केली असता योगी मेहनती आहेत, मात्र त्यांचा अनुभव थोडा कमी पडत असल्याचे मत राम चरित्र निषाद यांनी व्यक्त केले. योगी काम करण्यात उत्साही आहेत. पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाल्याने थोड्या फार त्रुटी राहत आहेत. मात्र त्यांच्या नेतृत्वात प्रदेशाचा विकास होत आहे, असे निषाद यांनी सांगितले.