लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : व्हीएनआयटीमध्ये इस्रोच्या सहकार्याने लवकरच पश्चिम क्षेत्रासाठी स्पेस टेक्नॉलॉजी इन्क्युबेशन सेंटर सुरू होणार आहे. यासंदर्भात व्हीएनआयटी व इस्रोमध्ये सामंजस्य करार झाला आहे.
ऑनलाईन माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमाला व्हीएनआयटीचे संचालक डॉ. प्रमोद पडोळे, इस्रोच्या सीबीपीओचे संचालक पी.व्ही. वेंकटकृष्णा यांनी स्वाक्षरी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. के. सिवान हे होते. केंद्र सुरू करण्याचा मुख्य उद्देश संशोधन क्षेत्रात रुची ठेवणाऱ्या तरुणांना प्रोत्साहित करणे व त्यांना चालना देणे आहे. सामंजस्य करारानुसार व्हीएनआयटीने हे केंद्र सुरू करण्यासाठी प्रशासकीय इमारतीतील ५ हजार चौरस फुटाचा एक माळा दिला आहे, सोबतच प्रयोगशाळा व इतर सुविधादेखील प्रदान करण्यात येतील.
हे केंद्र सुरू झाल्याने अंतराळ तंत्रज्ञानाशी संबंधित समस्या दूर होतील. सोबतच केंद्रासाठी इस्रो विद्यार्थ्यांचे प्रकल्प देईल, त्यामुळे ते काम करू शकतील, असे डॉ. के. सिवान यांनी सांगितले. या केंद्रामुळे पश्चिम क्षेत्रांतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र, गुजराज, राजस्थान, गोवा, दादरा व नगर, हवेली तसेच दीव-दमण यांनादेखील फायदा होईल.