नागपूर : राफेल जेट विमानाला बसविण्यात येणाऱ्या पाच महत्त्वाच्या सुट्या भागांची निर्मिती मिहानमधील दसॉल्ट-रिलायन्स प्रकल्पात करण्यात येते आणि नंतर हे भाग फ्रान्समध्ये राफेट जेट विमानाला जोडण्यासाठी विमानाच्या निर्मिती प्रकल्पात पाठविण्यात येत असल्याची माहिती मुंबईतील फ्रान्सचे महावाणिज्यदूत जीन-मार्क सेरे-शार्लेट यांनी दिली.
शार्लेट यांनी मिहानमधील दोन फ्रान्सच्या कंपन्या दसॉल्ट रिलायन्स एयरोस्पेस लिमिटेड (डीआरएएल) आणि एयर लिक्विडचा दौरा केला. ‘डीआरएएल’ उत्पादन प्रकल्पात राफेल आणि फाल्कन-२००० च्या निर्मितीसंदर्भात त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले, व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, ऊर्जा, शिक्षण आणि फ्रान्स भाषेत शिक्षण घेऊन अनेक क्षेत्रांत फ्रान्स आणि भारत यादरम्यान संबंध वाढविण्याचा दौऱ्याचा मुख्य उद्देश होता. प्रकल्पासाठी एजेंस फ्रान्किस डेव्हलपमेंट (एएफडी) पब्लिक डेव्हलपमेंट बँकेने २० वर्षांकरिता १३० मिलियन युरोचे आर्थिक साहाय्य केले आहे.
मेट्रो टप्पा-१वर समाधानी
शार्लेट म्हणाले, एएफडी नागपूर मेट्रो टप्पा-१ च्या कामावर समाधानी आहे. पुणे आणि गुजरातमधील अन्य मेट्रो प्रकल्पातही सक्रिय आहे. एएफडी नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यालाही आर्थिक साहाय्य करणार आहे; पण महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला कुणासोबत करार करायचा, हे त्यांना निश्चित करावे लागेल; पण फ्रान्स आणि एएफडीची नेहमीच कमी कार्बन प्रभावित योजनांसह शहराच्या गतिशील विकासात रुची असते, असेही ते म्हणाले.