नागपूर : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसरा सणांत विविध बाजारपेठा सज्ज झाल्या असून खरेदीला उधाण आले आहे. ग्राहकांच्या स्वागतासाठी आॅटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, सोने-चांदी आणि घरगुती उपकरणांच्या शोरूमची सजावट केली आहे. यंदा एकत्रितरीत्या २०० पेक्षा जास्त कोटींची उलाढाल होण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. (प्रतिनिधी)वाहन खरेदीला पसंतीदसरा मुहूर्तावर दुचाकी आणि चारचाकी वाहन खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पसंतीचे वाहन मिळावे म्हणून अनेकांनी महिन्यापूर्वीच नोंदणी केली आहे. मात्र आवडीचे वाहन दसऱ्याला घरी नेण्याचा अनेकांचा संकल्प आहे. दसऱ्याला गाडीची डिलेव्हरी देण्यासाठी शोरूम संचालकांनी अतिरिक्त व्यवस्था केली आहे. चारचाकीमध्ये सर्व कंपन्यांच्या जवळपास ७०० पेक्षा जास्त कार आणि ४ हजारांपेक्षा जास्त दुचाकी विक्रीचा अंदाज आहे. फ्लॅट, प्लॉट खरेदीदसऱ्याचा मुहूर्त साधत अनेकांनी फ्लॅटचे बुकिंग किंवा नव्या घरात प्रवेश करण्यासाठीचे नियोजन केले आहे. काहीजण गुंतवणुकीसाठी तसेच फार्म हाऊस म्हणून रिकामे प्लॉट घेण्यासाठी एजंट आणि विक्रेत्यांशी संपर्क साधत आहेत. अनेकांनी फ्लॅटचा ताबा घेण्याचा मुहूर्त साधला आहे. सोने-चांदीला मागणीदसऱ्याच्या मुहूर्तावर सोने, हिऱ्याचे दागिने आणि चांदीच्या वस्तू खरेदी करण्याकडे अनेकांचा कल वाढू लागला आहे. सोने, हिरे आणि चांदीत झालेली घसरण हे मुख्य कारण आहे. या दिवशी विशेषत: लक्ष्मीची मूर्ती, नाणे, पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू असो किंवा एखादा दागिना तरी खरेदी केला जात आहे. यामुळे सराफाकडे आठ दिवसांपूर्वीच दागिन्यांची आॅर्डर देण्यात आली आहे. याशिवाय दसऱ्याच्या मुहूर्तावर एक ग्रॅम तरी सोने खरेदी करणारा ठराविक वर्ग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या बाजारपेठेत होणारी उलाढाल कोट्यवधींच्या घरात राहील, असे सराफांनी सांगितले.
दसऱ्यानिमित्त खरेदीला उधाण
By admin | Published: October 22, 2015 4:26 AM