नागपूर : अद्यापही शहरात संघटन मजबुती मिळाली नसताना आम आदमी पक्षामध्ये अंतर्गत वादाची ठिणगी पडली आहे. काही बेजबाबदार पदाधिकारी वर्षानुवर्षे पदावर असून त्यांच्यामुळे पक्षाचे नुकसान होत असल्याचा आरोप अनेक कार्यकर्त्यांनी लावला आहे. या पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यासाठी चक्क शुक्रवारी पक्ष कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनीच निदर्शने केली.
पक्षाची स्थापना झाल्यापासून ‘आप’ला अद्यापही हवे तसे यश मिळू शकलेले नाही. सुरुवातीला ‘आप’कडे कार्यकर्त्यांचा ओढा होता. मात्र तरीदेखील जनतेत जाऊन पक्षाचा प्रभाव प्रस्थापित करता आला नाही. त्यातच आता अंतर्गत संघर्षाची ठिणगी पडली आहे. बंद खोल्यांमध्ये नियुक्ती करण्यात येते. कार्यकर्त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जात नाहीत. पक्षात फूट निर्माण झाली असून पदाधिकारी पक्षस्थापनेपासून असलेल्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष व प्रसंगी अपमान करत असल्याचा आरोप लावण्यात आला आहे. पक्षाच्या सिव्हील लाईन्स येथील कार्यालयासमोर नाराज कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. विदर्भ संयोजक देवेंद्र वानखडे, प्रदेश कोषाध्यक्ष जगजीतसिंह, अशोक मिश्रा, कविता सिंघल, भूषण ढाकूलकर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीदेखील करण्यात आली. प्रदेश संयोजक रंगा राचुरे हे शुक्रवारीच नागपूर दौऱ्यावर होते हे विशेष.
पक्षातील काही कार्यकर्ते पक्षाला कमकुवत करण्यासाठी जाणूनबुजून असे प्रकार करत आहेत. ते इतर पक्षांशी संबंधित असून त्यांच्या प्रभावाखाली निदर्शनासारखे प्रकार करत आहेत, अशी भूमिका ‘आप’चे शहर सचिव भूषण ढाकुलकर यांनी मांडली.