नागपूर : सध्या पाऊस जोरदार बरसतो आहे. नद्या दुथडी भरून वाहत आहेत, तर शहरातील तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. रस्त्यावर नाव चालवावी अशी स्थिती निर्माण झाली आहे. शहरातील अनेक वस्त्यांमध्ये आणि घरांमध्ये पाणी शिरण्याची स्थिती दिसत आहे. शासकीय कार्यालयेही अपवाद ठरलेली नाहीत. गिरीपेठ उप टपाल घराची स्थिती तर अशी आहे की, संपूर्ण कार्यालयालाच रेनकोट घालावे लागते. पावसात पाणीगळतीची धार अशी काही लागते की, संपूर्ण छतालाच ताडपत्रीने झाकण्यात आले आहे.
कार्यालयात शिरते पाणी
पावसाची सुरुवात होताच रस्त्यावर जमा झालेले पाणी नंतर थेट कार्यालयाच्या आत शिरते. अशावेळी १० बाय २०च्या या कार्यालयाच्या हॉलमध्ये सर्व कर्मचाऱ्यांना टेबलवर उभे होण्याशिवाय पर्याय उरत नाही. हे कार्यालय शंभर वर्षे जुने असून, बनावटही तेवढीच जुनी आहे. लाकडी दांड्यांच्या आधाराने व कौलारू असल्याने पाणी गळती सतत होत असते. पंखेही इंग्रजकालीन असावे, असेच भासतात. पावसात तर विजेचा धक्का बसण्याचीही भीती असते.
पी ॲण्ड टी सोसायटीची इमारत
१९१४ मधील पी ॲण्ड टी एम्प्लॉयर सेंट्रल को-ऑप. सोसायटी लि.ची गिरीपेठ येथील ही इमारत असून, नवीन इमारतीचे फाउंडेशन १९४० सालचे आहे. ज्या घरात उप टपाल घर आहे, ते १९४० पूर्वीचाच जुन्या वाड्यागत आहे. या वाड्यात भाड्याने गिरीपेठ उप टपाल घराचे कार्यालय आहे. येथील परिस्थितीबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी कसलीही माहिती देण्यास नकार दिला.
........