ऑनलाइन लोकमत नागपूर, दि. 9 - सत्य बोलणे हे आपले कर्तव्य असून माता-पिता व गुरुजनांचा नेहमी आदर करा, असा पारंपरिक उपदेश राज्यपाल तथा कुलपती चे. विद्यासागर राव यांनी आज येथे केला. महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा ८ वा पदवीदान समारंभ गुरुवारी पार पडला. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या समारंभात राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना डॉक्टर आॅफ सायन्सह्ण ही मानद पदवी प्रदान करण्यात आली.या समारंभात कुलपती या नात्याने राज्यपालांनी पदवी प्राप्त करणाऱ्या स्नातकांना पारंपरिक उपदेश केला. नेहमी खरे बोला, आपले कर्तव्य पार पाडा, जे शिक्षण प्राप्त केले आहे त्यापासून दूर जावू नका, आई-वडील- शिक्षक-अतिथी आणि देश यांना देव माना, असे कुलपती आपल्या पारंपरिक उपदेशात म्हणाले. विद्यार्थ्यांनी या उपदेशाचा आदर करुन पालन करावे, असेत्यांनी सांगितले.यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख पाहुणे म्हणून तर विद्यापीठाचे प्रति कुलपती तथा पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांची सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थिती होती. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोचन मोहपात्रा, सरसंघचालाक डॉ. मोहन भागवत, कुलगुरु ए. के. मिश्रा व कुलसचिव डॉ. अ. स. बन्नाळीकर हे व्यासपीठावर होते. संचालन डॉ. शिरिष उपाध्ये व डॉ. सुनीत वानखेडे यांनी केले. या पदवीदान समारंभात राज्यातील विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.नागपूरच्या अश्वनी चाफलेने १०, मुंबईच्या शिवांगी पै ने ९ तर रोहीत सिंगने पटकाविली ७ पदकेयावेळी विद्यार्थ्यांना मान्यवरांचे हस्ते पदवी व पदक प्रदान करण्यात आले. नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या अश्विनी रमेश चापले (काटोल, नागपूर) या विद्यार्थिनीने शैक्षणिक वर्ष २०१४-१५ साठी सहा सुवर्ण पदके व चार रौप्य पदके अशी एकूण १० पदके प्राप्त केली आहेत. तर २०१५-१६ या शैक्षणिक वर्षासाठी मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या शिवांगी देवदास पै या विद्यार्थिनीने आठ सुवर्ण व एक रौप्य पदकासह एकूण ९ पदके प्राप्त केली. नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या रोहीत सिंग या विद्यार्थ्याने तीन सुवर्ण व चार रौप्य पदकासह एकूण सात पदके मिळविले आहेत. या विद्यार्थ्यांचा राज्यपाल व मुख्यमंत्री यांनी गौरव केला.
सत्य बोला आणि कर्तव्यरत राहा - राज्यपाल
By admin | Published: March 09, 2017 10:42 PM