न्यायमूर्ती भूषण गवई : न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्या उपस्थितीत विशेषांकाचे लोकार्पणनागपूर : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रकाशित करण्यात आलेला क्रांतिसूर्य हा विशेषांक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजकारण, समाजकारण, अर्थकारण तसेच कामगार या क्षेत्रातील त्यांनी केलेल्या अजोड कामगिरीविषयी असलेल्या अभ्यासपूर्ण माहितीमुळे सर्वांगसुंदर व संग्राह्य झाला आहे, अशी प्रतिक्रिया उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केली. लोकराज्यच्या क्रांतिसूर्य या विशेषांकाचे लोकार्पण न्यायमूर्ती भूषण गवई तसेच न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्या हस्ते झाले. यावेळी माहिती संचालक राधाकृष्ण मुळी, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, ज्येष्ठ पत्रकार राहुल पांडे, अॅड. उदय डबले उपस्थित होते.माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे लोकराज्य हे मासिक नियमित तसेच दर्जेदार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करताना न्यायमूर्ती भूषण गवई पुढे म्हणाले, लोकराज्यच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक तसेच पर्यटनासंदभार्तील अभ्यासपूर्ण माहिती एकत्रपणे अभ्यासक व वाचकांना उपलब्ध होत आहे. शासनाच्या विविध योजना तसेच अंमलबजावणीसंदर्भातील माहितीसुद्धा या अंकामुळे अभ्यासकांना उपलब्ध होत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. न्यायमूर्ती नितीन सांबरे म्हणाले, लोकराज्य हे मासिक माहितीपूर्ण असल्यामुळेच सर्वांसाठी उपयुक्त अंक आहे. शासन निर्णयांसोबत महाराष्ट्राची ऐतिहासिक, सांस्कृतिक व सामाजिक माहिती या अंकाच्या माध्यमातून उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
लोकराज्यचा ‘क्रांतिसूर्य’ विशेषांक सर्वांगसुंदर
By admin | Published: April 12, 2017 1:52 AM