नागपूर : दप्तराच्या खरेदीवर काँग्रेस सदस्यांनीच आक्षेप घेतला आहे. प्रस्तावाचे इतिवृत्त कायम होण्यापूर्वीच साहित्य शाळेत पोहोचल्याने खरेदीवर प्रश्न निर्माण केले आहे. त्यामुळे शिक्षण सभापती व शिक्षणाधिकाऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत.
दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग पॉलिमर दप्तर खरेदी करणार आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून २.७५ कोटी रुपये निधी मिळाला आहे. खरेदीकरता निविदाही मागविण्यात आल्या. निविदा मंजूर करण्याचा प्रस्ताव शिक्षण समितीत न येता थेट सर्वसाधारण सभेत हा विषय आल्याने सर्वसाधारण सभेत सदस्य प्रकाश खापरे, मिलिंद सुटे यांनी यावर आक्षेप घेतला. अध्यक्ष बर्वे यांनी हा विषय शिक्षण समितीने ठेवल्यानंतर सर्वसाधारण सभेत घेण्याचे निर्देश दिले व खरेदीस स्थगिती दिली. या विषयाचे इतिवृत्तच कायम झाले नाही; पण पॉलिमर दप्तराची संपूर्ण खरेदी झाली असून, साहित्यही शाळेत पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नियमानुसार दप्तराच्या खरेदीचा विषय शिक्षण समितीसमोर ठेवणे आवश्यक होते; परंतु तसे झाले नाही. त्यामुळे आम्ही आक्षेप घेतल्याचे समिती सदस्यांचे म्हणणे आहे.