नागपूर: शेतमालाला पुरेसा भाव मिळावा या मागणीसाठी शेतकरी संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील धरमपेठ निवासस्थानापुढे ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुख्यमंत्री व शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांची रामगिरीवर बैठक होणार आहे.शरद जोशी यांनी गत आठवड्यातच नागपूरमध्ये ३० नोव्हेंबर रोजी ठिय्या आंदोलन करण्याचे जाहीर केले होते. फडणवीस विरोधी पक्षात असताना त्यांनी शेतमालाला जी किंमत मागितली होती त्याची आठवण करून देण्याचा उद्देश या आंदोलनामागे आहे. राज्यातील शेतकरी या आंदोलात सहभागी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी स.९.३० वा. मुख्यमंत्री आणि शरद जोशी यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत शरद जोशींसोबत शेतकरी संघटनेचे प्रांताध्यक्ष गुणवंत पाटील हंगर्गेकर, माजी आमदार वामनराव चटप, सरोज काशीकर, राम नेवले, शैला देशपांडे आणि दिनेश शर्मा उपस्थित राहणार आहेत.सध्या दुष्काळाच्या निमित्ताने शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर असताना आणि याचा फटका हिवाळी अधिवेशन काळात विद्यमान सरकारला बसण्याची शक्यता गृहीत धरुन मुख्यमंत्र्यांनी शेतकरी संघटनेशी चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यावर भर दिला आहे. (प्रतिनिधी)
मुख्यमंत्री-शरद जोशी यांच्यात आज चर्चा
By admin | Published: November 28, 2014 1:01 AM