लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नंबर प्लेटऐवजी बाईकवर ‘दादा’,‘भाऊ’ आदी विविध नावे लिहणारे आणि मोठ्या आवाजात गाडी चालवून रस्त्यावर हैदोस घालणाऱ्या बाईकर्सविरुद्ध वाहतूक शाखेने विशेष मोहीम चालवीत ३,८१८ चालकांविरुद्ध कारवाई केली. केवळ पाच दिवसात करण्यात आलेल्या या कारवाईमुळे वाहनचालकांमध्ये खळबळ उडाली आहे.बाईकस्वार युवक सायलेन्सरमध्ये बदल करतात तसेच नंबरऐवजी ‘दादा’, ‘भाई’, ‘राजे’ अथवा ‘बॉस’ लिहितात. बहुतांश युवकांमध्ये सध्या अशी फॅशन सुरू आहे. ते वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यासोबतच लुटमार करीत असल्याचे प्रकारही समोर आले आहेत. नंबरप्लेट फॅन्सी असल्यामुळे वाहनचालकाची ओळख पटत नाही. त्याचप्रकारे प्रेशर हॉर्नचा वापर करून रस्त्यावर हैदोस घालणाऱ्यांची संख्याही आता वाढत आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि आजारी लोकांना मोठा त्रास होतो. या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेने गेल्या १८ जूनपासून विशेष मोहीम सुरू केली आहे. १८ ते २३ जूनदरम्यान अशा ३,८१८ चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. यात प्रेशर हॉर्नचे ६९, वाहनात बदल करणारे २६८, फॅन्सी किंवा स्टायलिश नंबर प्लेटचे ३२७, आणि हेल्मेट न वापरणाऱ्या ५,१५४ दुचाकीचालकांचा समावेश आहे.
वाहतूक शाखेतर्फे बाईक चालकासह बुलेट किंवा रेसर बाईकमध्ये सायलेन्सरमध्ये बदल करणाऱ्या ऑटोमोबाईल डीलर आणि मॅकेनिकविरुद्धही कारवाई करण्यात येणार आहे. बाईक चालकांना विचारपूस करून अशा लोकांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कारवाई केली जाईल. दोषी चालकांचे परवाने रद्द करण्याची शिफारससुद्धा करण्यात येणार आहे.वाहतूक शाखेने बुलेट आणि रेसिंग बाईकची माहिती गोळा केली आहे. अशा सर्वांची चौकशी करून कारवाई करण्यात येणार आहे. फॅन्सी नंबर चालक स्वत:ची ओळख लपवण्याचा प्रयत्न करतात. तर मोठ्या आवाजात गाडी चालवणारे हैदोस घालत असतात. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई करणे आवश्यक झाले आहे.सुरुवातीला अशा बाईक चालकांना कार्यालयात बोलावून समज देण्यात येईल. चालक अल्पवयीन असल्यास पालक किंवा गाडीच्या मालकाला बोलावले जाईल. पुढेही ही कारवाई सुरू राहील, असे वाहतूक शाखेचे डीसीपी विक्रम साळी यांनी सांगितले.