लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रधान मुख्य आयकर आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर आशा अग्रवाल यांनी नागपूर विभागांतर्गत येणाऱ्या विदर्भातील सर्व जिल्ह्यात थकीत कर वसुलीची मोहीम तेज केली आहे. आयकर विभागाने गेल्या वित्तीय वर्षांमध्ये उत्पन्न मागणीची वसुली, अग्रिम कराचे भुगतान आणि स्वनिर्धारण कर देयांवर लक्ष्य केंद्रित केले आहे.गेल्या काही वर्षांमध्ये देय कराची वसुली करण्यासाठी आयकर विभाग, नागपूरने एक अभूतपूर्व पाऊल उचलले आहे. त्याअंतर्गत विभागाने कोट्यवधी रुपयांच्या कर वसुलीसाठी थकीत करदात्यांची १८ पेक्षा जास्त संपत्ती आणि दागिन्यांचा लिलाव केला आहे. तसेच लाखो रुपये जप्त केले आहेत. जे करदाते वैध देय कराच्या भुगतानासाठी पुढे येत नाहीत, अशा करचुकवेगिरी करणाऱ्यांसाठी कठोर संदेश आहे. आयकर विभाग, नागपूरने यापूर्वी चल आणि अचल संपत्तींचा लिलाव करण्याचा निर्णय कधीही घेतला नव्हता. पण भविष्यात अशाप्रकारे अनेक लिलाव करण्यात येणार आहे.ज्या करदात्यांनी थकीत कराचे भुगतान केले नाही आणि उत्पन्नाचे स्रोत लपविले आहे वा करचोरी करण्यासाठी थकीत करदात्यांना मदत केली आहे, अशी प्रकरणे आयकर विभाग, नागपूरने उजेडात आणली आहेत. अशा सर्व प्रकरणांमध्ये १५० पेक्षा जास्त अभियोजन दाखल केले आहे. अभियोजनाकरिता अनेक प्रकरणांची ओळख करण्यात आली आहे.