लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेतर्फे मंगळवारी झोनअंतर्गत निराधारांसाठी दोन दिवस कोविड लसीकरणाची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शुक्रवारी पहिल्या दिवशी ८८ लाभार्थी महिलांना पहिला डोस देण्यात आला.
काटोल रोड येथील मिशनरी ऑफ चॅरिटीज मदर टेरेसा होम शांतिभवन येथे एकूण ७८ पुरुष व ८८ महिला असे एकूण १६६ निराधार नागरिक राहत असून, या सर्वांकडे आधारकार्ड किंवा तत्सम कोणतेही शासनमान्य ओळखपत्र नाही. त्यामुळे येथे ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत आज पहिल्या दिवशी येथील महिलांचे लसीकरण करण्यात आले. शनिवारी सर्व पुरुषांनाही लस देण्यात येईल.
यावेळी मंगळवारी झोनच्या सभापती व नगरसेविका प्रमिला मथरानी, लसीकरण समन्वयक डॉ. गोवर्धन नवघरे, झोनल वैद्यकीय अधिकारी अतिक उर रहमान खान, डॉ. साक्षी ठाकरे उपस्थित होते.
या दोन दिवसीय लसीकरण मोहिमेसाठी झोनचे सहा. आयुक्त विजय हुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली व यांनी लसीकरण केले, तर संगणक चालक भूपेश बिनकर यांनी संगणकावर नोंदी पूर्ण केल्या. आशावर्कर प्रियंका कापसे व माया कावळे यांनी सहकार्य केले. झोनस्तरीय समन्वयक पुरुषोत्तम कळमकर व झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. अतिक उर रहमान खान यांनी या विशेष मोहिमेच्या यशस्वीतेकरिता सर्वांचे आभार व्यक्त केले.