एपीसीसीएफचे आदेश : तीन दिवसांची मोहीम नागपूर : मागील चार महिन्यापासून गायब असलेल्या ‘जय’ चा अद्याप सुगावा लागलेला नाही. यात आता ‘जय’ बाबत वेगवेगळ्या शंकाकुशंका व्यक्त केल्या जात असून वन विभागाची चिंता वाढली आहे. त्याचवेळी वन्यजीव विभाग (पूर्व) चे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक रामबाबू यांनी ‘जय’ च्या शोधात संपूर्ण सर्कलमध्ये ‘स्पेशल ड्राईव्ह’ राबविण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती पुढे आली आहे.माहिती सूत्रानुसार हा ड्राईव्ह पुढील २४, २५ अािण २६ सप्टेंबर अशा तीन दिवस चालणार असून, यात वन्यजीव आणि प्रादेशिक अशा दोन्ही विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश राहणार आहे. विशेष म्हणजे, ‘जय’ गायब झाल्यापासून वन विभागातर्फे प्रथमच असा ‘ड्राईव्ह’ राबविला जात आहे. यापूर्वी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्री भगवान यांच्या निर्देशानुसार विशेष शोधमोहिम सुरू करण्यात आली होती. यात वन्यजीव विभागाने पाच पथके तयार करून ते वेगवेगळ्या भागात रवाना केले होते. त्या सर्व पथकांनी मागील दोन महिने ‘जय’ चा शोध घेतला. परंतु त्याचा कुठेही सुगावा लागला नाही. त्याचवेळी वन विभागावर चोहोबाजूंनी दबाव निर्माण होऊ लागला. तसेच ‘जय’ हा व्याघ्र राजधानी पर्यंत सिमीत न राहता, तो थेट देशाच्या राजधानीपर्यंत पोहोचला. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र पाठवून ‘जय’ संबंधी माहिती दिली आहे. तसेच देशाचे गृहमंत्री राजराथ सिंग यांच्याकडे सीबीआय चौकशीची मागणी केली. एवढेच नव्हे, तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच ‘जय’ ची सीआयडी चौकशी सुरू केली आहे. यासर्व घडामोडीमुळे ‘जय’ हा मागील चार महिन्यांपासून चर्चेचा विषय बनला आहे.
‘जय’ च्या शोधात ‘स्पेशल ड्राईव्ह’
By admin | Published: September 23, 2016 3:02 AM