लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०८ व्या दीक्षांत सोहळ्यात कोरोना निर्बंधांमुळे विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकणार नाही. प्रमुख अतिथींच्या हस्ते पदके-पुरस्कार मिळणार नसल्याने गुणवंत विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे. परंतु या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने १२ जुलै रोजी विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्याचे ठरविले आहे. या सोहळ्याला दोन सत्रांत विभागण्यात आले आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी यांनी बुधवारी पत्रपरिषेदरम्यान दिली.
दीक्षांत सभागृहातच आयोजित करण्यात आलेल्या या पत्रपरिषदेला प्र-कुलगुरू डॉ.संजय दुधे, कुलसचिव डॉ.राजू हिवसे, परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ.प्रफुल्ल साबळे व माध्यम समन्वयक राजेंद्र पाठक हे उपस्थित होते.
दीक्षांत सभागृहात आयोजित होणाऱ्या या विशेष सत्कार सोहळ्यादरम्यान कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी व विद्याशाखांचे अधिष्ठाता उपस्थित राहतील. त्यांच्या हस्ते गुणवंतांना पदके व पारितोषिके प्रदान करण्यात येतील. सकाळी ११ ते दुपारी एक या कालावधीत विज्ञान व तंत्रज्ञान तसेच वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील ५४ विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात येईल. तर दुपारी दीड ते साडेतीन या कालावधीत मानव्यशास्त्रे व आंतरशास्त्रीय विद्याशाखेतील ५२ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येईल.
दुसरीकडे पीएचडी उमेदवारांना १३ ते १६ जुलै या कालावधीत पीएचडी पदवी प्रदान करण्यात येईल. दीक्षांत सभागृहातच पदवी प्रदान करण्यात येतील.
पीएचडी पदवी प्रदान करण्याचे वेळापत्रक
विद्याशाखा - दिनांक - वेळ
विज्ञान व तंत्रज्ञान - १३ जुलै - सकाळी ११ ते दुपारी ४
वाणिज्य व व्यवस्थापन - १४ जुलै - सकाळी ११ ते दुपारी ४
मानव्यशास्त्र - १५ जुलै - सकाळी ११ ते दुपारी ४
आंतरशास्त्रीय - १६ जुलै - सकाळी ११ ते दुपारी ४