विकास कामांना प्राधान्य : आवश्यक निधीची तरतूद करणार नागपूर : आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समितीला २०१५-१६ या वर्षाचा १४७४.९८ कोटींचा सुधारित अर्थसंकल्प सादर केला आहे. यात फेरबदल करण्यासाठी बुधवारी महापालिकेची विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. हर्डीकर यांनी २७ जानेवारीला स्थायी समितीला हा अर्थसंकल्प सादर केला होता. परंतु स्थायी समितीने मंजुरी दिलेली आवश्यक विकासे कामे मार्गी लागावीत, निधीची अडचण भासू नये यासाठी या अर्थसंकल्पात फेरबदल करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. यासाठी विशेष सभा होत आहे. आयुक्तांच्या अर्थसंकल्पात फेरबदल करण्यासाठी विशेष सभा आयोजित करण्याची मागील काही वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. २०१५-१६ या वर्षाचा १४७४.९८ कोटींचा सुधारित तर २०१६-१७ या वर्षाचा १५३४.४५ कोटींचा प्रस्तावित अर्थसंकल्प सादर केला आहे. प्रस्तावित अर्थसंकल्पात कोणत्याही स्वरूपाचा बदल केला जाणार नाही. मात्र सुधारित अर्थसंकल्पात काही शीर्षकाखाली करण्यात आलेली तरतूद अखर्चित राहण्याची शक्यता आहे. हा निधी आवश्यक असलेल्या शीर्षकात वळता केला जाणार आहे. आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात फेरबदल करण्याचे अधिकार स्थायी समितीला आहे. या अधिकाराचा वापर करून फेरबदल करण्यात आला आहे. याला विशेष सभेत मंजुरी घेणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी दिली. स्थायी समितीने गेल्या वर्षभरात २०० ते २५० कोटींचे रस्ते, गडरलाईन व महत्त्वाच्या पुलांच्या कामांना मंजुरी दिली आहे. यातील १०० ते १२५ कोटींची कामे सुरू झालेली आहेत. प्रस्तावित कामांना निधी उपलब्ध व्हावा, यासाठी फेरबदल प्रस्तावित आहेत. (प्रतिनिधी)
अर्थसंकल्पात फेरबदल करण्यासाठी विशेष सभा
By admin | Published: February 09, 2016 3:06 AM