नागपूर : मेडिकलच्या रुग्णांसाठी भाजी, पोळी, वरण, भात हा रोजचा मेनू ठरलेला. परंतु या वर्षी दिवाळीच्या दिवशी सामान्य रुग्णांसाठी खास मेनू तयार करण्यात आला आहे. रुग्णांचा ताटात भाजी, पोळी, वरण, भातासोबतच हलवा आणि पकोडाही असणार आहे.
रुग्णाला पौष्टिक आहार मिळाल्यास शारीरिक आणि मानिसक आरोग्यावर चांगला परिणाम होतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढून रुग्ण लवकर बरा होतो. या उद्देशानेच मेडिकलमध्ये स्वयंपाकगृहाची सुरूवात झाली. सध्याच्या स्थितीत मेडिकलसह सुपर स्पेशालिटी रुग्णालय, ट्रॉमा केअर सेंटर व टीबी वॉर्डातील असे एकूण सुमारे १२०० ते १५०० रुग्णांना सकाळच्या नाश्तासह दोन वेळेचे भोजन दिले जाते. यामुळे मेडिकलचे पाकगृह सकाळपासून ते रात्री उशीरापर्यंत पोषक भोजन तयार करण्यास व्यस्त असते. परंतु दिवाळीच्या निमित्ताने मेडिकलचे पाकगृह आणि आहार समितीची नुकतीच बैठक झाली.
अधिष्ठाता डॉ. राज गजभिये आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी दिवाळीच्या निमित्ताने ज्या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे त्यांच्यासाठी बैठकीत व्हेज पुलाव, पराठा, मूग डाळ हलवा, पकोडा असा मेनू तयार करण्यात आला आहे. याशिवाय बटाटा आणि हरभरा भाजीचाही आहारात समावेश असणार आहे. जवळपास ७०० रुग्णांसाठी हा मेनू असणार आहे