नागपूर : मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नागपूर शहर व ग्रामीण भागात मोठे नुकसान झाले आहे. भविष्यात नुकसान होता कामा नये व नुकसानासाठी एक विशेष पॅकेज देण्याचा प्रयत्न शासनाचा आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल. त्यासाठी सर्व विभागाला एकत्रित करून अहवाल तयार करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्यावर सोपवण्यात आली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी येथे दिली.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा मंत्री पाटील यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी उपरोक्त माहिती दिली. त्यांनी सांगितले, या नुकसानीसाठी नगर विकास, ग्राम विकास, तसेच मदत व पुनर्वसन या तीन विभागांचा संबंध आहे. नाग नदीची संरक्षण भिंत तुटली. नेमके किती नुकसान झाले, याचा प्रस्ताव आल्यावर काही निधी केंद्राकडून मागवण्यात येईल. तर काही निधी राज्य शासनाकडून देण्यात येईल. कायम स्वरूपी उपाययोजना करण्यावर भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अंबाझरी तलावाचे स्ट्रक्चरल व नॉन स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येईल. सिंचन तसेच मदत व पुनर्वसन विभागाच्या संयुक्तरित्या ही कारवाई होईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार संजय जयस्वाल, आमदार कृष्णा खोपडे, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, मनपा आयुक्त अभिजित चौधरी, सीईओ सौम्या शर्मा उपस्थित होते.
नाग नदीतील अडथळे दूर होतील
नाग नदीत पूल टाकून अडथळे निर्माण करण्यात आले. ते काढून टाकण्याच्या सूचना महापालिकेला करण्यात आल्या. आवश्यक असल्यास हॅंगकरून पूल तयार करायला हरकत नाही. नदीच्या संरक्षण भिंतीचेही नुकसान झाले. त्यासाठीचा अहवाल १० दिवसात तयार करून शासनाकडे पाठवण्याचे निर्देश महापालिकेला दिल्याचे पाटील यांनी सांगितले. नदीवर लगतचे अतिक्रमण काढण्यासाठी महापालिका पावले उचलतील. नदीच्या रेड लाइन व ब्लू लाइनमध्ये घर बांधताना अतिक्रमण होता कामा नये, पूर्वीचे फोटो लक्षात घेऊन अतिक्रमण काढण्याचा कारवाईचा निर्णय आयुक्त घेतील, असेही त्यांनी सांगितले.
- ३ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष मदत वाटप
नदी, नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याने प्रचंड नुकसान झाले. आतापर्यंत साडेबारा हजार पंचनामे झालेत. नुकसानीचा आकडा १६ ते १७ हजाराच्या घरात जाण्याची शक्यता आहे. सर्वांचे पंचनामे करण्यात येत आहे. दोन- तीन दिवसात पंचनामे पूर्ण होतील. ३ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष १० हजार सानुग्रह अनुदान देण्याची कारवाई सुरू होईल, असे पाटील यांनी सांगितले.
- पैसे मागणाऱ्यावर गुन्हे
सानुग्रह अनुदान मिळवून देण्यासाठी काहींकडून आर्थिक मागणी होत असल्याच्या तक्रारी आहेत. अशांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. पाण्याने महत्त्वाच्या कागदपत्रांचे नुकसान झाले असेल तर पंचमान्यात त्याची नोंद करायला हवी. भविष्यात हे पंचनामे महत्त्वाचे असेल. त्यामुळे पंचनाम्यात सर्व माहिती द्या, असेही त्यांना सांगितले.
- वडेट्टीवारांकडून मार्गदर्शन घेऊ
माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात एक हजार कोटीचे नुकसान झाल्याचे सांगितले आहे, यावर मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, माजी मंत्री वडेट्टीवार हे मार्गदर्शक आहे. एक हजार कोटीचे नुकसान झाल्याची माहिती त्यांच्याकडून घेईल. त्यांनी त्यांच्या काळात कशा प्रद्धतीने मदत दिली, याचेही मार्गदर्शन घेण्यात येईल, असेही सांगितले.