लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वीजचोरीचे गुन्हे नोंदवणे, त्या गुन्ह्यांचा तपास करणे व आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणे याकरिता शहरातील पाच झोनमध्ये प्रत्येकी एका पोलीस ठाण्यात विशेष कक्ष स्थापन करण्यात यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांना दिला. उपाध्याय न्यायालयात उपस्थित होते.संबंधित प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यासंदर्भात न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. ती याचिका न्यायालयाने स्वत:च दाखल केली आहे. वीज कायद्यात वीजचोरी करणाऱ्यांवर गुन्हे नोंदविण्याची तरतूद आहे. परंतु, अशाप्रकारचे गुन्हे फार कमी संख्येत दाखल केले जातात. तसेच, वीजचोरी करणाऱ्यांवर कडक कारवाई होताना दिसून येत नाही. शहरातील भालदारपुरा, मोमीनपुरा, हसनबाग यासह अनेक झोपडपट्ट्यांमध्ये वीजचोरी होते. त्यासाठी वीजवाहिन्यांवर आकडे टाक ले जातात. त्या वीजचोरीचा फटका प्रामाणिक ग्राहकांना सहन करावा लागतो. त्यांच्या एकूण वीज देयकात वीजचोरीतून होणाऱ्या तोट्याचा अधिभार लावण्यात येतो. परिणामी, वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदवणे व त्यांच्यावर कडक कारवाई करणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने अशा गुन्ह्यांसाठी विशेष पोलीस कक्ष स्थापन करण्याचा आदेश दिला. कक्षातील पोलीस केवळ हीच प्रकरणे हाताळतील. या प्रकरणात अॅड. दीपा चर्लेवार न्यायालय मित्र आहेत. वीजचोरीमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी ग्राहकांकडून वसूल करण्यात येणारा अधिभार बंद करण्यात यावा, अशी विनंतीही त्यांनी न्यायालयाला केली आहे.
वीजचोरीच्या गुन्ह्यासाठी विशेष पोलीस कक्ष : हायकोर्टाचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2019 8:45 PM
वीजचोरीचे गुन्हे नोंदवणे, त्या गुन्ह्यांचा तपास करणे व आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणे याकरिता शहरातील पाच झोनमध्ये प्रत्येकी एका पोलीस ठाण्यात विशेष कक्ष स्थापन करण्यात यावा.
ठळक मुद्देकक्ष केवळ हीच प्रकरणे हाताळेल