नागपूर : महाशिवरात्रीनिमित्त सुप्रसिद्ध महादेवालय पचमढी (मध्य प्रदेश) येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना विशेष सेवा देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ (एसटी)ने खास नियोजन केले आहे. त्यानुसार, प्रवाशांच्या सेवेसाठी नागपूर ते पचमढी आणि पचमढी ते नागपूर अशा २१-२१, बेचाळीस फेऱ्या चालविण्याचा निर्णय एसटीच्या अधिकाऱ्यांनी घेतला आहे.
८ मार्च २०२४ ला महाशिवरात्री आहे. मात्र, भाविकांची आठ दिवसांपूर्वीपासूनच पचमढीला दर्शनाला जाण्यासाठी लगबग सुरू होते. ते लक्षात घेता एसटीच्या नागपूर विभागाकडून १ मार्च ते ९ मार्च या कालावधीत या बसेस चालविण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यासाठी गणेशपेठ आगारातून १२, घाटरोड आगारातून १२, इमामवाडा आगारातून १२ आणि वर्धमाननगर आगारातून ६ बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
असे राहिल वेळापत्रक१ मार्चपासून नागपूर ते पचमढी मार्गावर दर अर्ध्या तासाने बस चालविली जाणार आहे. तिचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. पहिली बस दुपारी ४ वाजता सुटेल. त्यानंतर ४.३०, ५.००, ५.३०, ६.००, ६.१५, ६.३०, ७.१५, ७.३०, ८.००, ८.१५, ८.३०, ९.००, ९.३०, ९.४५, १०.००, १०.१५, १०.३०, १०.४५ आणि रात्री ११ वाजता.
पचमढी ते नागपूरदुपारी ३ वाजता पहिली बस पचमढीहून नागपूरसाठी सुटेल आणि त्यानंतर प्रत्येक १५ मिनिट ते अर्ध्या तासाच्या फरकाने रात्री १०.३० वाजतापर्यंत बसेस सुरू राहिल. प्रवाशांना सोयीचे व्हावे यासाठी नागपूरच्या गणेशपेठ बसस्थानकावर तसेच पचमढी बसस्थानकावर बॅनर, पोस्टर लावून तेथे पेंडॉलही घालण्यात येणार आहे.
स्वच्छ आणि चांगल्या गाड्याभाविकांना प्रवास करताना चांगला अनुभव यावा यासाठी सर्वच्या सर्व गाड्या ४४ आसनाच्या, चांगल्या स्थितीतील राहणार आहेत. तसेच गाड्यां साफ-स्वच्छ असेल, यावर आगार प्रमुखांनी खास लक्ष देण्याच्या सूचना उपमहाव्यवस्थापक श्रीकांत गभणे यांनी एका पत्रातून चारही आगार प्रमुखांना दिल्या आहेत.