लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फेटरी, येरला भागात वाघाच्या अस्तित्वामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी येरला, फेटरी परिसरात गावकऱ्यांची सभा घेऊन त्यांना वाघाच्या बंदोबस्तासाठी विशेष चमू तैनात केल्याची माहिती दिली.वन विभागातर्फे गावकऱ्यांची भीती दूर करण्यासाठी येरला ग्रामपंचायतमध्ये सभा घेण्यात आली. सभेसाठी येरला, फेटरी, बोरगाव, खडगाव, भरतवाडा, माहुरझरी, चिंचोली, दहेगाव, खंडाळा येथील सरपंच, उपसरपंच व गावकरी उपस्थित होते. सभेला उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ल, मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांनी मार्गदर्शन केले. या भागात होत असलेल्या पशुधन नुकसानीबाबत काय काळजी घ्यायची, कुठलीही मनुष्यहानी होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना देऊन वन विभागातर्फे करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. वाघावर नियंत्रण ठेवण्यासाठी फेटरी गावात विशेष चमू तैनात करण्यात आली असून, ही चमू माहिती मिळताच त्वरित घटनास्थळी पोहोचणार आहे. ज्या ठिकाणी जनावरे मारल्या गेली, तेथे मागील पाच दिवसांपासून ट्रॅप कॅमेरा लावण्यात आले असून, वन विभाग वाघाच्या हालचालीवर लक्ष ठेवून असल्याचे गावकऱ्यांना सभेत सांगण्यात आले. नागरिकांनी शेतात एकटे न जाण्याबाबत ग्रामपंचायततर्फे दवंडी देण्यात आली आहे. कुठलीही मनुष्यहानी होऊ नये यासाठी ग्रामपंचायत, वन विभागाकडून जनजागृती सुरू आहे. सभेला सर्व ग्रामपंचायत सदस्य, सेमिनरी हिल्सचे वन परिक्षेत्र अधिकारी विजय गंगावणे, कळमेश्वरच्या वन परिक्षेत्र अधिकारी अर्चना नौकरकर, वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.