नागपूर : नागपूर मार्गे धावणाऱ्या पुणे - हटिया - पुणे या रेल्वे गाड्याच्या १० अतिरिक्त फेऱ्या चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. सणासुदीच्या दिवसांत प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन या साप्ताहिक उत्सव विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येणार आहे.
त्यानुसार, ट्रेन नंबर ०२८४५ साप्ताहिक उत्सव विशेष रेल्वेगाडी पुणे येथून दर शुक्रवारी ३ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान सकाळी १०.४५ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ३.२५ वाजता ती हटिया स्थानकावर पोहचेल. त्याचप्रमाणे ट्रेन नंबर ०२८४६ साप्ताहिक उत्सव विशेष १ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर दरम्यान दर बुधवारी रात्री ९.३० वाजता हटिया येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे २.४५ वाजता पुणे येथे पोहचेल. ही गाडी दाैंड कार्ड लाईन, अहमदनगर, कोपरगांव, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा आणि राऊरकेला या रेल्वेस्थानकावर थांबे घेणार आहे.
गाडीची संरचना
या गाडीत २० एलएचबी डब्बे ज्यात १४ तृतीय वातानुकूलित, २ शयनयान, ३ सामान्य द्वितीय श्रेणीसह १ गार्ड ब्रेक व्हॅन आणि जनरेटर कारसह लगेज व्हॅन राहणार आहे. उपरोक्त गाडीच्या आरक्षणाची व्यवस्था २ नोव्हेंबर पासून रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि रेल्वेच्या संकेतस्थळावर सुरू होणार असून, गैरसोय टाळण्यासाठी प्रवासी त्याचा वापर करू शकतात.