सुमेध वाघमारे - नागपूर विविध विषयातील स्पेशालिस्ट (विशेषज्ञ) डॉक्टरांना गाव-खेड्यात आपली सेवा देण्यास ‘अॅलर्जी’ असल्याने ग्रामीण भागातील आरोग्य सेवा लंगडी झाली आहे. शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा पोहचली पाहिजे, असे शासन म्हणत असले तरी त्यादृष्टीने प्रयत्न होत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. सध्याच्या स्थितीत स्पेशालिस्ट डॉक्टरांची तब्बल १४१ पदे रिक्त आहेत. नागपूर मंडळातील आरोग्य संस्थेच्या अंतर्गत नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा असे सहा जिल्हे येतात. यात पाच जिल्हा रुग्णालये, दोन स्त्री रुग्णालये, तीन शंभर खाटांची उपजिल्हा रुग्णालये, दहा पन्नास खाटांची उपजिल्हा रुग्णालये, ५१ ग्रामीण रुग्णालये, २५१ प्राथमिक आरोग्य केंद्र तर १ हजार ६४३ उपकेंद्र आहेत. या रुग्णालयांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्य सेवा दिली जाते. विशेष म्हणजे, मागील सहा महिन्याचा विचार केला तर या सहा जिल्ह्यांमध्ये ५८ लाख ३४ हजार ८२७ रुग्णांनी उपचार घेतला. परंतु स्पेशालिस्ट डॉक्टरांची वानवा असल्याने अनेक रुग्णाना पुढील उपचारासाठी शहरातील खासगी इस्पितळांसह नागपुरातील मेडिकल, मेयोमध्ये धाव घ्यावी लागली आहे. यामुळे आरोग्य विभागाचाच आरोग्य सेवा देण्याचा उद्देश पूर्ण होत नसल्याचे स्पष्ट होते. मंडळांतर्गत येणाऱ्या या रुग्णालयांमध्ये विविध स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या ३५३ पदांना मंजुरी प्राप्त आहेत, परंतु ग्रामीण भागांमध्ये जाऊन सेवा देण्यास हे डॉक्टर तयार नसल्याने मंडळाला फक्त २१२ पदेच भरणे शक्य झाले आहे. १४१ जागा रिक्त असल्याने कामावर असलेल्या डॉक्टरांवरच कामाचा अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. परिणामी योग्य आरोग्य सेवा देण्यास ही रुग्णालये कमी पडत आहे.आरोग्य विभागाच्या नवनवीन शक्कलही प्रभावहीनग्रामीण भागातील रिक्त पदे भरून काढण्याकरिता आरोग्य विभागाने नवनवीन शक्कल शोधून काढली होती. प्रथमच आवडीनुसार डॉक्टरांना हवा असलेला जिल्हा सेवा करण्याकरिता उपलब्ध करून दिला. मुलाखतीच्या प्रक्रिया पार पडल्यानंतर तात्काळ त्यांना नियुक्तीपत्र देण्याची घोषणा केली. दुर्गम भागात सेवा देण्यास तयार असलेल्या डॉक्टरांना २० गुण देण्याचा निर्णय घेतला. परंतु याचा प्रभाव स्पेशालिस्ट डॉक्टरांवर पडला नाही.
स्पेशालिस्ट डॉक्टरांना गाव-खेड्याची ‘अॅलर्जी’
By admin | Published: November 12, 2014 12:53 AM