नागपूर : येथील महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील प्राणी कितपत सुरक्षित आहेत, यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली आहे. या प्राणिसंग्रहालयातील वाघाच्या पिंजऱ्यात चक्क कोब्रा साप जाऊन बसला होता. मात्र हा प्रकार लक्षात आल्यावर सापाला रेस्क्यू करून सोडून देण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.
ही घटना शनिवारची असली तरी महाराजबाग प्राणिसंग्रहालय प्रशासनाने दडवून ठेवली. मात्र प्राणिसंग्रहालयाला भेट देणाऱ्या पर्यटकांनी या सापाचे मोबाईलवरून चित्रीकरण केले. ते मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर या घटनेचे बिंग फुटले.
सुमारे पाच वर्षांपूर्वी या प्राणिसंग्रहालयातील ‘जाई’ नामक वाघिणीच्या पिंजऱ्यात असाच साप शिरला होता. त्याने वाघिणीला दंश केल्यावर तिची प्रकृती खालावली. किडण्या फेल झाल्या होत्या. त्यानंतर उपचारादरम्यान सहा महिन्यांनी तिचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर महाराजबाग प्रशासनाने सर्वच प्राण्यांच्या पिंजऱ्याभोवती बारीक छिद्रांची मूर्गा जाळी लावली होती. या काळात त्या सडल्यावरही पुन्हा बदलविण्याकडे लक्ष देण्यात आले नाही. परिणामत: तशाच घटनेला सामोरे जावे लागले.
महाराजबाग प्राणिसंग्रहालयाचा परिसर झाडीझुडपांनी वेढलेला असून बाजूलाच नाला वाहतो. या परिसरात मोठ्या प्रमाणावर सापांचा वावर असल्याने प्राण्यांसाठी हे धोकादायक आहे. या संपूर्ण परिसरात वारंवार सापांचे दर्शनही घडत असते.
नव्या जाळ्यांसाठी फाईल टाकली
या संदर्भात महाराजबाग प्राणिसंग्रहालयाचे प्रभारी डॉ. सुनील बावस्कर यांना विचारणा केली असता, या घटनेला त्यांनी दुजोरा दिला. लावलेली जाळी जुनी झाल्याने ती सडली आहे. नवीन जाळी लावण्यासाठी कृषी महाविद्यालयाच्या प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविला असल्याचे त्यांनी सांगितले.