नियमांचे पालन नाही : सेवानिवृत्त अभियंत्याची जनहित याचिका नागपूर : महामार्ग व शहरांतर्गतच्या रोडवर मनमानी पद्धतीने स्पीड ब्रेकर बांधले जात आहेत. सध्या अशी असंख्य स्पीड ब्रेकर्स राज्यात अस्तित्वात आहेत. स्पीड ब्रेकरसंदर्भात इंडियन रोड काँग्रेसने मोजमाप ठरवून दिले आहे. परंतु, या मोजमापांचे काटेकोर पालन होत नाही. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त सहायक अभियंता बबन रणदिवे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्याने उदाहरणादाखल वरोरा नाका ते बामणीपर्यंतच्या महामार्गावरील नियमबाह्य स्पीड ब्रेकर्सची माहिती सादर केली आहे. इंडियन रोड काँग्रेसच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, रॅमलीन स्पीड ब्रेकर्सची उंची १५ ते २५ मिलिमीटर व रुंदी २०० ते ३०० मिलिमीटर पाहिजे. परंतु, या रोडवर ५० ते १५० मिलिमीटर उंचीचे व ४०० ते ८०० मिलिमीटर रुंदीचे रॅमलीन स्पीड ब्रेकर्स आहेत. तसेच, मोठ्या आकाराच्या स्पीड ब्रेकर्सची उंची १० सेंटीमीटर व रुंदी ५ मीटर हवी. पण, हे मोजमापही पाळण्यात आलेले नाही. मुंबई उच्च न्यायालयाने २७ एप्रिल २००५ रोजी एक जनहित याचिका निकाली काढून स्पीड ब्रेकर्ससंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे पाळण्याचे व चुकीच्या पद्धतीने बांधलेले स्पीड ब्रेकर्स तोडण्याचे निर्देश दिले होते. यानंतरही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी).
रोडवरील स्पीड ब्रेकर्स हायकोर्टात
By admin | Published: August 04, 2016 2:07 AM