अमृता फडणवीस यांचे आवाहन : आयएमएच्या नवीन कार्यकारिणीचे पदग्रहणनागपूर : अवयव दानातून दुसऱ्यांना जीवनदान करण्याचे पुण्यकर्म जरी कितीही मोठे असले तरी लोकांना फारशी कल्पना नसल्याचे जाणवते. दुसरे म्हणजे, अवयव दानाला घेऊन अनेक गैरसमजही आहेत. कदाचित याच कारणास्तव अवयवदानाला हवा तसा प्रतिसाद जनसामान्यांतून मिळत नाही. एका एका अवयवसाठी अनेक दिवस वाट बघत आयुष्य कंठणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. म्हणूनच अवयवदान अभियान गतिमान करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी येथे केले.‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ (आयएमए) नागपूर शाखेच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा रविवारी पार पडला. यावेळी त्या विशेष अतिथी म्हणून बोलत होत्या. मंचावर आयएमए महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अशोक तांबे, नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. वैशाली खंडाईत, सचिव डॉ. प्रशांत राठी, माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक अढाव, डॉ. वाय. एस. देशपांडे, डॉ. अविनाश वासे, डॉ. अर्चना कोठारी व डॉ. आशिष दिसावल उपस्थित होते. डॉक्टरांच्या हल्ल्याला घेऊन अमृता फडणवीस म्हणाल्या, डॉ़क़्टरच सुरक्षित नसतील तर ते उपचार कसे करणार. त्यामुळे त्यांना सुरक्षा देणे महत्त्वाचे आहे. ‘आयएमए’ची यंदाची संकल्पनाही अतिशय स्तुत्य आहे. अवयवदान हे महत्त्वाचे आहे. भारतात पाच लाख रुग्णांचा अवयव न मिळाल्याने मृत्यू होतो. भारतात दहा लाखामागे केवळ दोन व्यक्ती अवयवदान करणाऱ्या आहेत. त्यामुळे अवयव दानाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी संपूर्ण डॉ़क़्टरांनी पुढाकार घ्यावा.नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. वैशाली खंडाईत यांनी आपल्या मनोगतात वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रमांची माहिती दिली. ‘स्वयंमसिद्धा’ व ‘उड्डाण’ या उपक्रमातून शालेय विद्यार्थिंनींसाठी विविध उपक्रमही राबविले जाणार असल्याचेही त्या म्हणाल्या. प्रास्ताविक डॉ. अविनाश वासे यांनी केले. गेल्या वर्षीच्या विविध कार्यक्रम व उपक्रमांची माहिती डॉ. अर्चना कोठारी यांनी दिली. डॉ. वैशाली खंडाईत यांचा परिचय डॉ. वर्षा ढवळे यांनी दिला. संचालन डॉ. अनुराधा रिधोरकर व डॉ. समीर जहागिरदार तर आभार प्रदर्शन डॉ. प्रशांत राठी यांनी केले. कार्यक्रमाला डॉ. बी. के. शर्मा, डॉ. संजय देवतळे, डॉ. अल्का मुखर्जी, डॉ. दिनेश अग्रवाल, डॉ. दिनेश सिंग, डॉ. संजय देशपांडे, डॉ. प्रशांत निखाडे, डॉ. विनोद खंडाईत, डॉ. देव, डॉ. कुश झुनझुनवाला यांच्यासह आयएमएचे सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)अवयवदान करणाऱ्या नातेवाईकांचा सन्मानक्रिकेटपटू अजय सोनटक्क्के यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी अवयवदानासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांच्या मुली व त्यांचे भाऊ अविनाश सोनटक्के यांचा सत्कार करण्यात आला. तसेच निरामय रुग्णालयाचे डॉ. सुनील यांचाही सत्कार करण्यात आला. अवयव दानाचे स्टीकर वाटप‘अवयव दान, श्रेष्ठ दान’ या ब्रीद वाक्यावर ‘आयएमए ’ची नवीन कार्यकारिणी काम करणार आहे. पदग्रहण सोहळ्यात अवयदानाचे अर्ज, स्टीकरचे वितरण करून शपथही देण्यात आली. अमृता फडणवीस, डॉ. अशोक तांबे आणि डॉ. वर्षा खंडाईत यांनी अवयवदानाचा संकल्प केल्याने त्यांना अवयवदान कार्डाचे वाटप करण्यात आले. तसेच उपस्थितांना अवयवदानसंबंधी शपथ देण्यात आली.
अवयवदान अभियान गतिमान करा
By admin | Published: April 24, 2017 1:46 AM