नागपूर : जीवघेण्या कोरोनाचा दुसऱ्या लाटेने कहर माजविला होता. मेडिकलमधील वैद्यकीय सोयीही अपुऱ्या पडल्या होत्या. याचा फटका कोरोना रुग्णांसोबतच इतर आजाराच्या रुग्णांनाही बसला. जानेवारी महिन्यात गंभीर व किरकोळ शस्त्रक्रियेची संख्या १५१६ झाली असताना एप्रिल महिन्यात निम्म्याहूनही कमी होऊन ५०९ झाल्या. मात्र, आता पुन्हा शस्त्रक्रियेची संख्या वाढताना दिसून येत आहे. जून महिन्यात ८६३ शस्त्रक्रिया झाल्या आहेत.
नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा दुसऱ्या लाटेची घोषणा प्रशासनाने फेब्रुवारी महिन्यात केली असली तरी जानेवारी महिन्यापासूनच रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली. मेडिकलमध्ये जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत २००वर रुग्ण भरती झाले होते. तरीही या दरम्यान १५१६ शस्त्रक्रिया झाल्या. परंतु, फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाने वेग धरल्याने मेडिकलमधील विविध विभागाचे वॉर्ड कोरोना रुग्णसेवेत येऊ लागले. परिणामी, इतर आजाराचे रुग्ण कमी झाले. फेब्रुवारी महिन्यात १०४२, मार्च महिन्यात आणखी कमी होऊन ८६२, एप्रिल महिन्यात ५०९, मे महिन्यापासून दुसरी लाट ओसरू लागताच ५५७, तर जून महिन्यात ८६३ रुग्णांवर शस्त्रक्रिया झाल्या.
-सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला कोरोनाच्या उपचारापासून दूर ठेवण्यात आले होते. यामुळे अंजिओग्राफी, अंजिओप्लास्टी, हृदय शस्त्रक्रिया, मेंदूवरील शस्त्रक्रिया, नेफ्रोलॉजी, युरोलॉजीच्या शस्त्रक्रिया सुरू होत्या. एवढेच नव्हे तर गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजीमध्ये रोज एण्डोस्कोपी होत होत्या. परंतु, रुग्ण कमी असल्याने यांची संख्या इतर दिवसांच्या तुलनेत कमी होती.
-मेडिकलच्या सर्वच विभागात वाढल्या शस्त्रक्रिया
मेडिकलच्या ईएनटी विभागात जानेवारी महिन्यात गंभीर आणि किरकोळ मिळून ७८ शस्त्रक्रिया झाल्या होत्या. एप्रिल महिन्यात ही संख्या २५वर आली होती. मागील महिन्यात पुन्हा वाढून १०३वर गेली. जनरल सर्जरीमध्ये जानेवारी महिन्यात ६४७ शस्त्रक्रिया झाल्या. एप्रिल महिन्यात कमी होऊन १९६, तर जून महिन्यात वाढून २२७ झाल्या. स्त्री रोग विभागात जानेवारी महिन्यात ३२८, एप्रिल महिन्यात १९६, तर जून महिन्यात २३२ शस्त्रक्रिया झाल्या. नेत्ररोग विभागात जानेवारी महिन्यात १७७, एप्रिल महिन्यात ५९, तर जून महिन्यात ९८, ऑर्थाेपेडिक विभागात जानेवारी महिन्यात १७७, एप्रिल महिन्यात ६८, तर जून महिन्यात १४४, तर प्लास्टिक सर्जरी विभागात जानेवारी महिन्यात ५१, एप्रिल महिन्यात केवळ ५, तर जून महिन्यात ३५ शस्त्रक्रिया झाल्या.
-ओपीडीतही वाढले रुग्ण
कोरोनाचा दुसऱ्या लाटेतही मेयो, मेडिकल व सुपर स्पेशालिटीचा बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) बंद नव्हता. परंतु, रुग्णसंख्या कमी झाली होती. मेयोमध्ये इतर दिवसांत दोन हजारांवर जाणारी ओपीडी फेब्रुवारी महिन्यापासून कमी होऊन ४०० ते ५००, मेडिकलमध्ये तीन हजारांवरून ८०० ते १२००, तर सुपरमध्ये ४०० वर जाणारी २०० ते ३०० रुग्णांवर संख्या आली होती.
-शस्त्रक्रियेसाठी प्रतीक्षा यादी १० दिवसांवर
कोरोना काळात केवळ गंभीर रुग्णांवरच शस्त्रक्रिया करण्याच्या सूचना असल्याने नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या होत्या. परंतु, मे महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण कमी होताच शस्त्रक्रियांचा वेग वाढला होता. सध्या मेयो, मेडिकलमध्ये नियोजित शस्त्रक्रियेसाठी प्रतीक्षा यादी जवळपास दहा दिवसांवर आली आहे.
-कोरोना काळातही शस्त्रक्रिया
मेडिकलमध्ये कोरोना काळातही गंभीर व किरकोळ शस्त्रक्रिया सुरू होत्या. परंतु, त्यांची संख्या कमी होती. परंतु, जून महिन्यापासून पुन्हा सर्वच विभागात शस्त्रक्रियेचा आकडा वाढताना दिसून येत आहे. सर्वच विभागातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
-डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल
-मेडिकलमधील शस्त्रक्रिया
जानेवारी : १५१६
फेब्रुवारी : १०४२
मार्च : ८६२
एप्रिल : ५०९
मे : ५५७
जून : ८६३