लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तथागत गौतम बुद्धांच्या विचारांना मानणारे अनुयायी जगभरात असून सर्वांना भारताबद्दल विशेष प्रेम आहे. देशातील व विदेशातील पर्यटकांना सहजतेने बौद्ध स्थळांना सहजपणे भेटी देता याव्यात व ‘कनेक्टिव्हिटी’ वाढावी यासाठी ‘बुद्धिस्ट सर्किट’ व ‘धर्मयात्रा सर्किट’ची घोषणा करण्यात आली होती. याअंतर्गत लुंबिनी, बुद्धगया, सारनाथ, कुशीनगर यासारख्या महत्त्वाच्या स्थळांना एकमेकांशी जोडण्यासाठी महामार्ग बांधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात विशेष पुढाकार घेतला आहे. हे काम लवकरात लवकर कसे पूर्ण व्हावे, यासाठी ते स्वत: याकडे लक्ष देत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.जगभरातील पर्यटक भारतातील बौद्ध स्थळांना ते वर्षभर भेटी देत असतात. त्यामुळे बौद्ध स्थळांना पर्यटनाच्या दृष्टीने विकसित केल्यास मोठ्या प्रमाणावर पर्यटक वाढतील आणि त्यातून रोजगार वाढेल, या उद्देशाने केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी देशभरातील ३८ ‘बुद्धिस्ट सर्किट’ची घोषणा केली. लुंबिनीला आलेल्या पर्यटकास बुद्धगया, सारनाथ, कुशीनगर यांच्यासह देशातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी दळणवळणाच्या सर्व सुविधा उपलब्ध असाव्यात, यासाठी आराखडादेखील तयार करण्यात आला.याअंतर्गत सुरू असलेल्या कामाला वेग आला आहे. ‘बुद्धिस्ट सर्किट’अंतर्गत बिहार राज्यातील बुद्धगया, नालंदा, राजगीर, वैशाली, कहालगाव, पटना यांना एकमेकांशी जोडण्यात येत आहे. तर ‘धम्मयात्रा सर्किट’अंतर्गत बिहारमधील बुद्धगया, उत्तर प्रदेशमधील सारनाथ, कुशीनगर व पिपरवाह यांना जोडण्याचा आराखडा तयार आहे. याशिवाय विस्तारित ‘धम्मयात्रा सर्किट’अंतर्गत बिहार राज्यातील बुद्धगया, विक्रमशीला, उत्तर प्रदेशमधील सारनाथ, कुशीनगर, कपिलवस्तू, संकिसा, पिपरवाह यांना एकमेकांशी जोडण्यात येत आहे. या तिन्ही ‘सर्किट’ला जोडण्यासाठी महामार्गांचे काम वेगाने सुरू आहे. अनेक ठिकाणी तर काम बहुतांशपणे संपण्याच्या मार्गावरदेखील आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी राज्य शासनाला शक्य ते सहकार्य करण्यात येत आहे.