नागपूर : दारूच्या नशेत असलेल्या एका तरुणाने नागपुरात भर रहदारीच्या मार्गावर चक्क तीन किलोमीटरपर्यंत कारखाली दुचाकी घासत नेली. ज्या तरुणांची दुचाकी होती त्यांनी वेळीच उडी मारल्याने ते बचावले. गुरुवारी रात्री वर्धा मार्गावरील घडलेल्या या घटनेचा काही वाहनचालकांनी व्हिडीओ काढला व तो सोशल माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला. यानंतर पोलिस प्रशासन जागे झाले व तरुणावर कारवाई करण्यात आली.
शुभम पिंजारे (२५, हिंगणघाट, वर्धा) असे आरोपीचे नाव आहे. वडिलांवर खासगी उपचार सुरू असल्याने तो त्याच्या मित्रासोबत नागपुरात आला होता. रात्री हिंगणघाटकडे परतत असताना अजनी चौकाजवळ दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरील तरुण खाली पडले मात्र दुचाकी कारलाच अडकली होती. शुभमने कार आणखी वेगाने पळवली व दुचाकी कारखाली घासतच होती. वाहनचालकांनी पाठलाग करून हॉर्न वाजवत त्याच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. मात्र शुभमने दुर्लक्ष केले. काही वाहनचालकांनी याचा व्हिडीओ काढला व लगेच समाजमाध्यमांवर टाकला. त्यातून पोलिसांना माहिती मिळाली.
पोलिसांनी कारच्या क्रमांकावरून हिंगणघाट येथून शुभमला ताब्यात घेतले व त्याची कारदेखील जप्त करण्यात आली आहे. सोनेगाव पोलिस ठाण्यात गुुन्हा दाखल झाला असला तरी या घटनेतून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. नेटिझन्सनेदेखील यावर संताप व्यक्त करत एकाहून एक भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.