नागपूर : सक्करदरा चौकात नवख्या पिकअप गाडीचालकाने ट्रॅफिक सिग्नल तोडून दुचाकीवरील विद्यार्थिनी व तरुणाला चिरडले. मंगळवारी सकाळी घडलेल्या या घटनेने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
जान्हवी विनोद चौधरी आणि दीपक उईके (३५) अशी जखमींची नावे आहेत. जान्हवी सकाळी सक्करदरा पोलिस ठाण्यासमोरून (एमएच -४९- वाय -५७८८) या स्कूटीवर बसून कॉलेजच्या दिशेने जात होती. दीपक उईके हे त्याच दिशेने (एमएच-४९-बीई-६८९३) क्रमांकाच्या दुचाकीने जात होते. सक्करदरा चौकाचा वाहतूक सिग्नल सुरू झाल्यावर दोघेही पुढे निघाले. त्याचवेळी भांडे प्लॉट चौकातून रेशीमबाग चौकाच्या दिशेने जाणारी बोलेरो (एमएच४०-वाय-४५७३) ही पिकअप गाडी भरधाव वेगात आली. सिग्नल तोडत चालकाने जान्हवीला अगोदर धडक दिली. त्यानंतर दीपकच्या दुचाकीला चिरडले. यात दोघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर चालक गाडी सोडून पळून गेला. घटनास्थळावर नागरिक जमा झाले व त्यांनी दोघांनाही इस्पितळात दाखल केले.
नंबरप्लेटच्या आधारे पोलिसांनी गाडीच्या मालकाशी संपर्क साधला. त्याने भांडे प्लॉट चौकातील कमलेश तिवारी या ऑटोडीलरला गाडी विक्रीसाठी दिल्याचे सांगितले. पोलिसांनी तिवारीच्या कार्यालयात जाऊन विचारणा केली असता, गाडी तेथील कर्मचारी करण चौधरी (२१, कुही) हा घेऊन गेल्याचे कळाले. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर करणला अटक केली.
मालकाच्या अनुपस्थितीत चालवत होता गाडी
आठवडाभरापूर्वी तिवारीकडे संबंधित पिकअप गाडी विक्रीसाठी आली होती. करणने मालकाच्या अनुपस्थितीत गाडी चालवण्यास सुरुवात केली. अनुभव आणि परवाना नसतानाही त्याने गाडी चालवत सिग्नलदेखील तोडले.