नागपूर : भरधाव वेगात असलेली स्कॉर्पिओ घरात घुसल्यामुळे आठ वर्षांचा चिमुकला गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला, तर स्कॉर्पिओतील पाचजण जखमी झाले. ही घटना गिट्टीखदान पोलिस ठाण्यांतर्गत शुक्रवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास आयबीएमरोडवर घडली.
जॉर्डन उर्फ विक्की फिलीप जोसेफ (८) असे या अपघातात मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे, तर भुपेंद्र देवाजी शिवणकर, असे आरोपी स्कॉर्पिओ चालकाचे नाव आहे. फिर्यादी लीना टोनी जोसेफ (३०, आयबीएम रोड, शैलेश किराणाजवळ, गिट्टीखदान) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या सासू कॅथरीन जोसेफ या त्यांच्या घरासमोर राहतात. त्यांचा दीर अगस्टीन फिलिप्स हे सुद्धा त्याच वस्तीत काही अंतरावर राहतात.
अगस्टीनचा मुलगा जॉर्डन हा नेहमी त्यांच्या सासू कॅथरीन यांच्या घरी खेळण्यासाठी येत असतो. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता जॉर्डन खेळायला आला. तो फुटबॉल आणण्यासाठी घरात गेला. फुटबॉल घेऊन तो घराबाहेर येत असताना टीव्ही टॉवर चौकाकडून भरधाव वेगाने आलेली पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ कार क्रमांक एम.एच. २६, ए. एफ-०२२६च्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार थेट कॅथरीन यांच्या घरात घुसली. यात त्यांचे घर पडले व जॉर्डन गंभीर जखमी झाला. स्कॉर्पिओतील पाच व्यक्तीही जखमी झाले.
घटनेमुळे वस्तीतील नागरिक गोळा झाले. त्यांनी कारचालकाची धुलाई केली. शेजारी राहणारे श्रीपत गजभिये यांनी जॉर्डनला मेयो रुग्णालयात नेले असता तेथे त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गिट्टीखदान पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी स्कॉर्पिओ चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.