नागपूर : ठोक आणि किरकोळ बाजारात भाज्यांची आवक वाढली आहे. ठोकमध्ये भाज्या स्वस्त, तर किरकोळमध्ये महागच आहेत. एक आठवड्यापासून भाज्यांची आवक वाढल्याने भाव थोडे कमी झाले आहेत. पालेभाज्यांची आवक वाढल्यामुळे स्वस्त आहेत. गेल्या आठवड्यात पालक, मेथी आणि फूल कोबीची रस्त्याच्याकडेला स्वस्तात विक्री करीत असल्याचे दृश्य शहरात दिसत होते. पण आता या भाज्या, वांगे किरकोळमध्ये महाग विकत आहेत. पालेभाज्या सोडल्या, तर सर्वच भाज्या आवाक्याबाहेर आहेत. गृहिणींना एवढा आठवडा पालेभाज्यांवर भागवावा लागणार आहे. आवक वाढल्यानंतर सर्व भाजीपाला पुन्हा स्वस्त होईल, असे विक्रेत्यांनी सांगितले.
गुरुवारी किरकोळमध्ये भाज्यांचे दर (प्रतिकिलो)
पालक १५, मेथी ३०, वांगी ४०, हिरवी मिरची ३०, कोथिंबीर ३०, चवळी शेंग ४०, गवारी ४०, भेंडी ४०, कारले ४०, फूलकोबी ४०, पत्ताकोबी २०, कोहळे ३०, लवकी २०, सिमला मिरची ४०, ढेमस ५०, परवळ ५०, हिरवा मटर ४०, तूरशेंग ४०, पोपट ५०, वाल शेंग ३०, मुळा २०, गाजर ३०, काकडी २०, फणस ४०.
पालक स्वस्त; मेथी महागच
ठोक बाजारात पालक ७ ते ८ रुपये आणि मेथी १२ ते १५ रुपये किलोदराने विकली जात आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत मेथीची आवक कमी झाली, तर पालक स्थानिक उत्पादक शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात येत आहे. गेल्या महिन्यात पालक ६० रुपये, तर मेथी ८० रुपयांवर गेली होती; पण आता भाव कमी झाला आहे. दोन आठवड्यांपूर्वी पालक व मेथी १० रुपयांत दोन जुड्या मिळत होत्या. किरकोळमध्ये पालक २० रुपये, तर मेथी ३० रुपये किलो दराने विकली जात आहे.
टोमॅटो आवाक्याबाहेर
स्थानिक शेतकऱ्यांकडून गावरान टोमॅटोची आवक सुरू झाली आहे. पण पावसामुळे मालाचा दर्जा निकृष्ट आहे. बेंगळुरू, संगमनेर आणि मदनपल्ली येथून आवक असल्यामुळेच ठोकमध्ये भाव ४० रुपयांवर थांबले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून किरकोळमध्ये भाव ६० रुपयांपुढे असल्यामुळे गृहिणींची ओरड सुरूच आहे. स्थानिकांकडून दर्जेदार टोमॅटोची आवक वाढण्याची शक्यता असून, डिसेंबरअखेरपर्यंत किरकोळमध्ये भाव २५ ते ३० रुपयांपर्यंत खाली येतील, असा विक्रेत्यांना अंदाज आहे.
...म्हणून पालेभाज्या स्वस्त, इतर महाग :
मध्यंतरी पावसामुळे पालेभाज्या शेतातच खराब झाल्या होत्या. त्यातील काही प्रमाणात पालेभाज्या बाजारात आल्या; पण दर्जा निकृष्ट आहे. सध्या पालेभाज्यांची आवक वाढल्यामुळे भाव स्वस्त आहेत. त्या तुलनेत अन्य भाज्या महागच आहेत. पुढील आठवड्यात स्वस्त होण्याची अपेक्षा आहे.
राम महाजन, ठोक विक्रेते.
कळमन्यात नागपूर जिल्हा आणि अन्य राज्यांतून भाज्यांची आवक वाढली आहे. पालेभाज्यांचे भाव कमी असले तरीही अन्य भाज्यांचे भाव वाढलेले आहेत. टोमॅटोचे भाव अजूनही कमी झालेले नाहीत. यंदा हिवाळ्यात ग्राहकांना जास्त भावातच भाज्या खरेदी कराव्या लागत आहेत.
नंदकिशोर गौर, ठोक विक्रेते.