नागपूर (खापरखेडा) : वेकाेलिच्या सिल्लेवाडा (ता. सावनेर) काेळसा खाणीच्या सीम-२ मधील सेक्शन-६ मध्ये मंगळवारी (दि. २३) दुपारी स्फाेट झाल्याने सहा कामगार जखमी झाले आहेत. यातील दाेघांना नागपूर शहरातील हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.
जखमींमध्ये सेक्शन इन्चार्ज अनिल बोबडे, कुलदीप उईके, अनिल सिंग ट्रेनी, विलास मुडे, राजू शामराव मिस्री, महिपाल व योगेश्वर यांच्यासह अन्य एका कामगाराचा समावेश आहे. हे सर्व कामगार कंत्राटी असून, ते मंगळवारी दुपारी नेहमीप्रमाणे सिल्लेवाडा काेळसा खाणीतील सीम-२ च्या सेक्शन-६ मध्ये काेळसा काढण्याचे काम करीत हाेते. त्यातच एअर स्टाेनिंग ब्लास्ट झाल्याने आठ कामगार जखमी झाले.
माहिती मिळताच वेकाेलि प्रशासनाने मदतकार्य सुरू केले. वेकाेलिच्या सुरक्षारक्षकांनी जखमी कामगारांना लगेच बाहेर काढून वेकाेलिच्या रुग्णालयात पाेहाेचविले. तिथे सर्वांवर उपचार करण्यात आले. यातील दाेघे गंभीर जखमी असल्याने त्यांना प्रथमाेपचारानंतर नागपूर शहरातील हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आल्याची माहिती वेकाेलि प्रशासनाने दिली. हा स्फाेट नेमका कशामुळे झाला, हे मात्र प्रशासनाने स्पष्ट केले नाही.