लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भातील जमिनीची पोत व हवामान विचारात घेता येथे मसाल्याची शेती खूप चांगल्या पद्धतीने केली जाऊ शकते. मसाल्याच्या ६३ प्रजातींपैकी ५९ प्रजातींचे उत्पादन विदर्भात सहज होऊ शकते. विशेष म्हणजे मसाले शेतीमुळे आर्थिक चित्रही पालटू शकते. त्यामुळे विदभार्तील शेतकºयांनी पर्याय म्हणून मसाले शेतीचा विचार करावा, असे आवाहन भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या मसाले विभागाचे माजी प्रमुख डॉ.एम. एन. वेणूगोपाल यांनी केले. रामटेक तालुक्यातील छत्रपूर येथे मसाले शेती व नैसर्गिक पद्धतीने शेती लागवड करण्यासंदर्भात विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.रणजित कांबळे होते. याशिवाय आ. आशिष जैस्वाल, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुनिता गावंडे, माजी आमदार मुझफ्फर हुसैन हेदेखील उपस्थित होते. विदर्भात तापमान जास्त असले तरी उन्हाळ्याच्या दिवसात योग्य व्यवस्थापन केले तर मसाले शेतीवर कुठलाही परिणाम होत नाही. पूर्व विदर्भात धानाचे उत्पादन होते. धान शेतीच्या बांधावर दालचिनी, तेजपत्ता, जायफळ, जावित्री ही मसाला पिके सहज घेता येतात. आंबा उत्पादन होणाºया भागात काजूचे पीक घेता येते. खाण्याच्या पानांचे उत्पादन ज्या भागात होते तेथे काळी मिरीचे उत्पादनही भरघोस होते. आंबा, फणस,शेवगा, कटाल यासारख्या झाडांवर काळी मिरीची वेल सहज वाढते, असेही त्यांनी सांगितले. मसाला शेती कशी करायची याचे मॉडेल येथे विकसित केले जाईल व शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येईल, अशी माहिती मुझफ्फर हुसैन यांनी दिली. भारतीय वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी सलीम सय्यद यांनी बांबू लागवडीबद्दल तर कृषी तज्ज्ञ हेमंत चव्हाण यांनी नैसर्गिक शेतीबद्दल मार्गदर्शन केले. नरेंद्र जिचकार यांनी आभार मानले.