संजय लचुरिया।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीतील सरदार वल्लभभाई पटेल चौक...वेळ सकाळी ९.३२ ची. कार्यालयात जाण्याची वेळ असल्याने चाकरमान्यांची लगबग सुरू होती. अचानक वेगात एक कार येते अन् डोळ्याचे पाते लवते ना लवते तोच दुचाकीस्वार महिलेला समोरून धडक देते. मोठ्या आवाजामुळे सर्वांचेच लक्ष जाते अन् दिसते रस्त्यावर वेदनेने विव्हळत पडलेली महिला. तिच्याभोवती घोळका जमा होतो पण मदतीसाठी कुणीही पुढे येत नाही. ‘कोणीतरी अॅम्ब्युलन्स बोलवा’, ‘गाडीला थांबवा’ अशा सूचना देण्यासाठी पुढाकार घेतात, पण जखमीला रस्त्याच्या कडेला नेण्यासाठीदेखील कुणी हात देत नाही. हे चित्र पाहून प्रश्न उपस्थित होतो की लोकांमधील माणुसकी खरोखरच हरवत चालली आहे का अन् हेच आहे का नागपूरकरांचे ‘स्पिरिट’?मंगळवारी सकाळी मोक्षधाम नजीकच्या सरदार वल्लभभाई पटेल चौकात एका भरधाव चारचाकीने दुचाकीला धडक दिली. यामुळे दुचाकीस्वार महिला रस्त्यावर पडली व जखमी झाली. तिला मदत करण्याचे सौजन्य न दाखविता कारचालकाने गाडी पुढे दामटली व बैद्यनाथ चौकाकडे भरधाव वेगाने निघून गेला. दरम्यान, काही तरुणांसह नागरिक जखमी महिलेजवळ जमले. महिला रक्ताच्या थारोळ्यात व चक्कर येत असलेल्या अवस्थेत असताना कुणीही मदतीचा हात दिला नाही. त्याच क्षणी तेथून जात असलेल्या प्रस्तुत प्रतिनिधीला हा प्रकार दिसला अन् गाडी थांबवत त्याने मदतीसाठी धाव घेतली. इतरांकडून केवळ सूचनाच येत होत्या. अखेर मदतीसाठी एक सायकलस्वार महिला धावली व दोघांनी मिळून जखमीला रस्त्याच्या कडेला नेले. आश्चर्याची बाब म्हणजे इमामवाडा पोलीस चौकी ही घटनास्थळापासून अगदी जवळच होती. पोलिसांना कळविण्यासाठी कुणी पुढाकार घेतला नाही. ‘बहुत बुरा हुआ’ अशी प्रतिक्रिया देत गर्दी शमली. परंतु ही घटना संवेदनशील व्यक्तींच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालून गेली.महिलेनेच दिला मदतीचा हातमहिला जखमी असताना तिला दवाखान्यात नेण्यासाठी एकानेही पुढाकार घेतला नाही. एखादी कार थांबविण्यासाठी हातदेखील दाखविला नाही. आॅटोचालकांनी ‘हमे परेशानी नहीं चाहिए’ असे म्हणत हात वर केले. अखेर एका कारचालक महिलेला हा प्रकार दिसला व तिने स्वत:हून गाडी थांबवत जखमीला दवाखान्यात नेण्यासाठी पुढाकार घेतला.१०८ क्रमांक काय कामाचा?प्रस्तुत प्रतिनिधीचा मोबाईल बंद असल्याने त्याने एका ‘दर्शक’ नागरिकाच्या मोबाईलवरून १०८ वर फोन लावला. परंतु चार वेळा फोन लावूनदेखील कुणीच उचलला नाही. अखेर पाचव्यांदा फोन लागला. परंतु त्यात विस्तृत चौकशी करण्यात आली. मोक्षधाम चौक वाडी परिसरात आहे का, अशी तिकडून विचारणा करण्यात आली. अखेर सखोल पत्ता सांगितल्यावर काही वेळातच अॅम्ब्युलन्स येईल असे सांगण्यात येईल. परंतु त्यानंतर बराच वेळ ना कुणाचा फोन आला ना वेळेत अॅम्ब्युलन्स आली.
हेच आहे का नागपूरकरांचे ‘स्पिरीट’?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2020 10:57 AM
मंगळवारी सकाळी मोक्षधाम नजीकच्या सरदार वल्लभभाई पटेल चौकात एका भरधाव चारचाकीने दुचाकीला धडक दिली.
ठळक मुद्देअपघातग्रस्त महिलेचा मदतीसाठी टाहोसहकार्य करण्याऐवजी लोक बनले केवळ मूकदर्शक