प्रा. डॉ. संदीप ताटेवारलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: नुकतेच माझ्या वाचनात आले की आनंद हा फुलपाखरासारखा असतो. त्याच्या मागे लागले की तो दूर पळतो व निवांत बसलो की तो अलगद आपल्या खांद्यावर येऊन बसतो. खरंच, आनंदाचं हे असंच असतं. भूतकाळातला मनस्ताप व भविष्यकाळातली चिंता केली की तो भुरकन उडून जातो मात्र वर्तमान काळात राहिले की आपल्या जवळ येऊन बसतो. अमूक एक वस्तू मिळाली की मी आनंदी होईन या आपल्या सवयीमुळे आपण आयुष्यभर आनंदापासून वंचित राहतो. आयुष्यभर आपण आनंदला आपल्यापासून क्षणोक्षणी पुढे ढकलत असतो जसे की शिक्षण पूर्ण झाल्यावर, मनासारखी नोकरी मिळाल्यावर, लग्न झाल्यावर, मुले झाल्यावर, निवृत्त झाल्यावर खूप आनंदानी जगेन; पण आता मात्र खूप पैसा कमावेन या सबबीखाली आपलं संपूर्ण आयुष्यच निघून जातं व आपण जीवन जगण्याच्या शर्यतीत आनंदाला आपल्या सोबत घ्यायचे विसरुनच जातो. म्हणूनच आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंदात घालवायला पाहिजे. जेव्हा आपण निस्वार्थ प्रेम करतो, अपेक्षारहित जगतो, निष्काम कर्म करतो, ईश्वरीय सानिध्य प्रत्येक गोष्टीत अनुभवतो, समाधानी वृत्ती बाळगतो, प्रत्येक परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक ठेवतो, इतरांशी अनावश्यक स्पर्धा टाळतो, क्षमाशील असतो व दुसऱ्यांसाठी जगतो तेव्हा आपल्याला जीवनात आनंद मिळत जातो. म्हणूनच हे गाणे अर्थपूर्ण ठरते,आनंद या जीवनाचा, सुगंधापरी दरवळवाझिजुनी स्वत: चंदनाने, दुसऱ्यास मधुगंध द्यावा ..उगवत्या सूर्याला आनंदाचा अर्घ्य दिला की मावळताना तो खूप समाधान देऊन जातो. खरंतर, आनंद हा विनामूल्य मिळतो पण आपल्याला आयुष्यभर त्याचा पत्ताच नसतो. फुलपाखरु प्रत्येक फुलातून मधुकण गोळा करीत असतो तसेच आपण सुद्धा आयुष्यातल्या प्रत्येक कमार्तून आनंद वेचला, प्रत्येक परिस्थिती मध्ये आनंद शोधला व चिंता करण्यापेक्षा चिंतन केले म्हणजे आपण आनंदानी शिगोशिग भरून जावू यात काहीच शंका नाही. ८४ लक्ष योनीतून प्राप्त झालेल्या या दुर्लभ मानवी जन्माचं कल्याण करण्यासाठी अरुण दाते यांनी गायलेले हे गीत आनंदच रहस्य सांगून जाते. ते म्हणजे,या जगण्यावर, या जन्मावर शतदा प्रेम करावेया ओठांनी चुंबन घ्यावी हजारदा ही मातीअनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी ..