नागपूर : ‘ध्यान’ ही अद्भुत, अनुपम अशी योगसाधना आहे. जी साधकाला सुक्ष्मातीसूक्ष्म अणुरेणुच्या आकारात अस्तित्वात असलेल्या परमात्म्याशी एकरूप होण्याची संधी प्रदान करते. ही संधी प्राप्त करण्यासाठी आज शेकडो साधक ‘समर्पण ध्यान योग’चे प्रणेते सद्गुरू श्री शिवकृपानंद स्वामींच्या आभामंडळात सामील झाले आणि पूर्णत: समर्पित होत विलक्षण अशा क्षणाची अनुभूती घेतली.
‘लोकमत’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सोमवारी रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पाईंट येथे ‘हिमालयन ध्यान शिबिर’ आयोजित करण्यात आले. यावेळी सद्गुरूंनी प्राचीन भारतीय योगसाधनेची परंपरा, योग आणि योगासन यातील फरक, हिमालयात १६ वर्षांच्या वास्तव्यात आलेली आध्यात्मिक अनुभूती, गुरुजनांची संगत आणि विश्व म्हणजे काय, अशा विविध संकल्पना उलगडून सांगितल्या. यावेळी स्वामींनी उपस्थितांच्या प्रश्नांची उत्तरेही दिली.
या शिबिराचे उद्घाटन लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी सद्गुरू श्री शिवकृपानंद स्वामी यांच्या पत्नी गुरू माँ, आयआयएमसी नवी दिल्लीचे संचालक अनिल सौमित्र, काँग्रेसचे शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सुनीता गावंडे, मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी, श्री शिवकृपानंद स्वामी फाऊंडेशनचे महाराष्ट्र प्रमुख आचार्य आशिष कालावार, योग प्रभा भारती सेवा संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी शिना ओमप्रकाश, लोकमतचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने, लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्र, लोकमत टाईम्सचे संपादक एन. के. नायक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन नेहा जोशी यांनी केले.
‘वसुधैव कुटुंबकम्’ची संकल्पना ‘योगसाधने’तूनच शक्य : श्री शिवकृपानंद स्वामी
आज सारे जग योगासनाच्या मागे लागले असून योग आणि योगासन एकच असल्याच्या भ्रमात आहेत. योग हे एक विशाल क्षेत्र असून, योगसाधना ही अष्टांग योग मार्गातील एक प्रकरण आहे. प्राचीन भारतात आपल्या ऋषिमुनींनी दिलेल्या ‘वसुधैव कुटुंबकम्’ या संकल्पनेला साकार करण्याची क्षमता केवळ योगसाधनेतच असल्याचे श्री शिवकृपानंद स्वामी यांनी यावेळी सांगितले. ‘विश्व’ ही संकल्पना उलगडून सांगत त्यांनी विश्व म्हणजे स्व: चा अंतरात्मा होय. योगसाधनेद्वारे या स्व:च्या कक्षा रुंदावत एक आभामंडळ (ऑरा) तयार करता येतो आणि आपल्या विश्वाची शांती प्रस्थापित करता येते, असे सद्गुरूंनी सांगितले. यावेळी त्यांनी नागपुरातील बुटीबोरी येथे ६० एकर जागेवर समर्पण आश्रमाची उभारणी करण्यात येत असल्याचीही माहिती दिली.
समर्पण योग शक्तीमुळे जीवनात परिवर्तन - विजय दर्डा
सद्गुरू श्री शिवकृपानंद स्वामी यांनी केलेल्या साधनेचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना देण्यासाठी ते निरंतर कार्यरत आहेत. त्यांच्या समर्पण योग शक्तीमध्ये जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडविण्याची क्षमता आहे. सर्वसामान्यांना आत्मिक शांती प्रदान करण्यास ते प्रयत्नरत आहेत. आज या शिबिरात सहभागी झालेल्या एकाने जरी समर्पण योग साधनेद्वारे चेतनेची अनुभूती घेतली, तरी ‘लोकमत’ने नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित हे शिबिर यशस्वी झाले, असे समजेल. आपण सगळे मिळून नव्या दिशेने अग्रेसर होऊ आणि चेतना व दिव्य शक्तीला एकत्रित करत नवा आनंद साजरा करू, असे आवाहन लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी यावेळी केले.